बहिण भावाचा ऋणानुबंध : रक्षाबंधन
(रत्नाकर पाटील धाराशिव प्रतिनिधी)
श्रावण महिन्यातील पौर्णिमा राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणून ओळखली जाते. बहिण भावाच्या अतूट, स्नेहमय व पवित्र नात्याची आठवण करून देणारा सण. बहिण भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी किंवा धागा बांधून त्याचे औक्षण करून दीर्घ आयुष्याची देवाला प्रार्थना करते. भाऊ तिचे सतत रक्षण करण्यासाठी तत्पर रहाण्याचे वचन देतो. बहिण भावाच्या सोज्ज्वळ नात्याचे ऋणानुबंध व्यक्त करणारा सण म्हणजे रक्षाबंधन.
रक्षाबंधन सण साजरा करताना कांही राज्यात नोकर मालकाला राखी बांधून रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. काही प्रांतात पत्नी पतीला राखी बांधून रक्षण करण्यासाठी विनंती करते. राखीचा अर्थ रक्षण करणे. याच दिवशी कोळी बांधव समुद्राची पुजा करून नारळ समुद्रात सोडतात व येणाऱ्या चक्रीवादळापासून रक्षण करण्यासाठी आराधना करतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. समुद्राला नारळ अर्पण करून रक्षणाची प्रार्थना करतो.
हिंदू धर्मातील पौराणिक कथानुसार सांगितले जाते एखद्या भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली. बोट चिरले व रक्त वाहू लागले. रक्ताने हाताची बोटे लालबुंद झाली. तिथे कृष्णाची सखी बहिण सुभद्रा होती. तिने पाहिले व धावत घरात जाऊन बोटाला बांधण्यासाठी चिंधी शोधायला लागली. बराच वेळ गेला तिला कापड किंवा चिंधी सापडली नाही. कृष्णाची मानलेली बहिण द्रौपदी ही तिथे उपस्थित होती. तिने पटकन भरझरी शालूचा पदर फाडला व बंधू कृष्णाच्या बोटाला चिंधी बांधली.
चिंधी बांधते द्रोपदी
हरीच्या बोटाला
कृष्णाने बहिण द्रोपदीला रक्षण करण्याचे वचन दिले. दुर्योधन व शकुनी मामा बरोबर द्युत विद्या खेळतांना पांडव हरले. कौरव जिंकले.पांडवांनी पत्नी द्रोपदीला
खेळताना डावावर लावले व खेळात पराभव झाला. भर सभेत दुर्योधनाने द्रौपदीचे वस्त्र हरण केले. पांडवांना अपमानास्पद वागणूक दिली. भावाचे कर्तव्य समजून कृष्णाने साड्या पुरवून तिचे लज्या रक्षण केले. द्रोपदीला संकटातून बाहेर काढले.
ऐतिहासिक प्रसंगानुरूप इतिहासात असे सांगितले जाते की, बहादूरशहा नावाच्या मुस्लिम राजाने चित्तौड प्रांतावर हल्ला केला. चित्तोडची राणी कर्मावतीने हल्याचा प्रतिकार केला. घनघोर युद्ध सुरू झाले. बहादूर शहाच्या सैन्यापुढे कर्मावतीचे सैन्य कमी पडले. या युद्धात राणी पराजित झाली. कर्मावती राणीने हुमायूँ बादशहाला भाऊ मानून राखी पाठवली व बहिणीचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली. बहिणीच्या रक्षणासाठी हुमायूँ बादशहाने सैन्य पाठविले व बहिण कर्मावतीचे आणि तिच्या राज्याचे रक्षण केले. राणी कर्मावतीने सैन्याच्या मदतीने लढाई जिंकली. हुमायूँ बादशहाने मानलेल्या बहिणचे व राज्याचे रक्षण केले. बहिणी ने भावाचे हृदयपूर्वक आभार मानले.
पौराणिक ग्रंथांतील कथेनुसार देव व दानवात युद्ध सुरू झाले. युद्धात देव दानवांकडून पराभूत व्हायला लागले. आसुराचा राजा वृत्रासुराने देवाचा राजा इंद्राला युद्धाचे आवाहन केले. देवाधिपती इंद्र वज्र अस्त्र घेऊन युद्धाला निघाला. त्यावेळी युद्धात इंद्राला विजय मिळावा म्हणून इंद्राची पत्नी शूचीने विष्णुकडून मिळालेला धागा पतीच्या हातावर बांधला.युध्दात देवाचा विजय झाला व दानव पराभूत झाले. इंद्राला विजय मिळाला.
बहिण भावाच्या पवित्र नात्याचे मूर्त रूप म्हणजे रक्षाबंधन होय. बहिण भावाचे नाते हे पवित्र, सोज्वळ व अतूट असते. बहिण भावाला पाटावर बसवून सुंदर रांगोळी काढून, ओवाळून ती भावाचे औक्षण करते. भावाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते.
सोनीयाच्या ताटी, चंदनाच्या पाटी
ओवाळीते मी भाऊराया रे! वेड्या बहिणची वेडी ही माया.
बहिण भावाचे ऋणानुबंध या सणातून व्यक्त केले जाते. रक्ताच्या नात्यापलीकडे असणारे शुद्ध भावनेचे नाते म्हणून रक्षाबंधन सणाला ओळखले जाते. राखीच्या मोबदल्यात भाऊ बहिणीला पैसे स्वरूपात ओवाळणी देतो. बहिणीस मदत केल्याने भावाला काही कमी पडत नाही. देव बहिणीच्या आशिर्वादाने भावाला भरभरून देतो.
कांहीं ठिकाणीं झाडाला राखी बांधून सण साजरा केला जातो. त्याबद्दल झाड सावली, पाने, फुले, फळे, पाऊस, शुद्ध हवा देऊन पर्यावरणाचे रक्षण करते.
सीमेवर नोकरी करीत असलेल्या सैनिकांना राखी पाठवून भारत मातेचे रक्षण करण्याची प्रार्थना केली जाते.सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देऊन देशाचे रक्षण करतात. ऊन, वारा, पाणी याची तमा न बाळगता शत्रुवर करडी नजर ठेवून देश रक्षण करतात. अशा शूरवीर जवानांना देशातील मुली, महिला राखी पाठवून भाऊ मानतात. भावाची जिम्मेदारी वाढते. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावून कर्तव्य पार पाडतात.
अशा तऱ्हेने भारतात रक्षाबंधन हा फार प्राचीन काळापासून सण साजरा केला जातो. ही आमच्या देशाची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई बहिण. ताटी उघडा ज्ञानराजा म्हणून केविलवाणी विनवणी करते. लाडक्या मुक्ताईचे ऐकून ताटी उघडली जाते. बाहेर येता क्षणी लाडक्या मुक्तेला मिठी मारून ज्ञानदादा रडतो. बहिणीचे अपार प्रेम, ममता, जिव्हाळा या रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून व्यक्त होतो.रक्षाबंधन बहिण भावाच्या प्रेमाचे, स्नेहाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
रत्नाकर बाबुराव पाटील { पर्यवेक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता.जि. धाराशिव.


