सर्जा राजाचा सण: पोळा
*काही भागात श्रावणात तर काही भागात भाद्रपद महिन्यात हा सण साजरा केला जातो
भारतीय संस्कृतीत बैलपोळा सणाला विशेष महत्त्व आहे. पशुधनाबद्दल आदराची भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा होय. भारत कृषीप्रधान देश आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती असून शेती पूरक व्यवसाय ही केले जातात. ग्रामीण भागात शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे.शेती ही पाऊसावर अवलंबून आहे. पाऊस खूपच झाला की ओला दुष्काळ व पाऊस नाही पडला की कोरडा दुष्काळ पडतो. लोक कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ पसंत करतात. कोरड्या दुष्काळात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरे गुरेढोरे चारा -पाण्याविना उपाशी मरतात.शेती पिकत नाही. ओला दुष्काळ यालाच अतिवृष्टी म्हणतात. जमीन वाहून जाते, काळी माती खरडून जाते, पिकाचे अतोनात नुकसान होते. शेतकरी चिंताग्रस्त व परेशान होतो.
शेतकरी बैलांच्या सहायाने शेती करतात. शेतीची नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी सर्व शेतीची मशागतीची कामे करण्यासाठी बैल महत्त्वाची भूमिका बजावतात.
सरत्या श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्याला पोळा सण येतो. बैल हे महादेवाचे वहान आहे. बैलाला नंदी म्हणतात. वर्षभर शेतात राब- राबणाऱ्या बैला प्रती प्रेम भावना व्यक्त होते. बैल पोळा सण शेतकरी आनंदाने साजरा करतात. बैला प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा सण होय. हा सण महाराष्ट्र राज्यातील फार महत्त्वाचा मराठमोळा सण आहे. विविध राज्यात हा सण साजरा केला जातो.पोंगल, कारवाणी, बैलपोळा, वृषभपूजा, नंदीपूजा असे नावे आहेत.ज्यांच्याकडे शेती नाही ते लोक ही मातीचे बैल तयार करून पूजा करतात. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बैलपोळा एक मराठी सण म्हणून आनंदाने साजरा करतात. या दोन दिवसांत बैलांना काम नसते. पूर्णपणे विश्रांती देण्यात येते. चाबूक मारला जात नाही. भक्ती भावाने नंदीपूजा केली जाते.
“पोळा सणात सण मोठा
नाही आनंदाला तोटा”.
पोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलांना छान स्नान घातले जाते. नदी, तलाव, ओढे, नाले या ठिकाणी बैलांना स्वच्छ धुतले जाते.
बैलांच्या खांद्यावर हाळदी व तेल लावून चोळले जाते. काम करून करून त्यांचा खांदा दु:खू नये हीच भावना असते.खांद्याला दुखापत होऊ नये. यालाच खांदे मळणी म्हणतात. बैलांना पूरण पोळी खायला घातली जाते. अंगावर रंग लावून, शिंगे रंगवली जातात. विविध रंगाचे वारणेस लावून चमकी बेगड लावले जाते. पाटीवर सुंदर नक्षीकाम केलेली झुली टाकली जाते. डोक्यावर बाशिंग बांधले जाते, गळ्यात कवड्यांच्या माळा, चंगाळी, घुंगरमाळा, पायात तोडे असा सुंदर साज श्रृंगार करून मारूती मंदिर दर्शन व प्रदक्षिणा घातली जाते. मंदिराच्या जवळ आंब्याच्या पाण्याचे तोरण बांधले जाते. गावातील मुख्य पाटलांचा तोरण तोडण्याचा मान असतो. गावात पहिली बैल पूजा पाटलांची होते. नंतर गावातील ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. बैलांचे पूजन करीत बैलांचे विवाह लावला जातो. सोबत गाय ऊभा करून बैल नवरदेव व गाय नवरी म्हणून लग्न लावले जातात. मंगलाष्टके गायण करून अक्षतांचा वर्षाव केला जातो. बॅन्ड किंवा मंगलध्वनी वाजवले जातात. पुरणपोळीचा नैवेद्य चारला जातो. कधी कधी बैल पोळी खात नसेल तर जावाई रूसला म्हणतात. गावातून सर्जा -राजाची जोरदार वरात ,मिरवणूक काढली जाते. बैलांना सोनं दाखवलं जाते. शेतात सोनं पिकवणाऱ्या सर्जा राजाची थाटामाटात वरात काढली जाते. सनई, वाजंत्री, नृत्य केले जाते. महादेवाचे वहान नंदी म्हणून मनोभावे पूजा केली जाते.
“ईडा पिडा टळू दे
बळीचे राज येऊ दे.”
बळीराजा बैलांना चारा पाणी देऊन मग भोजन करतो. बैलाचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैल पोळा होय. बैलांच्या श्रमाचे योगदान म्हणून शेतकरी बैल पोळा साजरा करतो.
रत्नाकर बाबुराव पाटील
(पर्यवेक्षक)
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा, शिंगोली ता. जि. धाराशिव
मो. ९४०३३९४८१८.


