राष्ट्राच्या उभारणीत शिक्षक : शिल्पकार *धाराशिव प्रतिनिधी रत्नाकरपाटील यांच्याकडून *”गुरूर् ब्रम्हा ,गुरूर् विष्णू, गुरूर् देवो महेश्वरा*
गुरूर् साक्षात परब्रह्म, तस्मेयन श्री गुरूवेन महा”.
आई जशी बाळावर संस्कार करते, तसे गुरू शिष्यांना घडविण्याचे पवित्र कार्य करीत असतो. जीवनाला दिशा देण्याचे अनमोल कार्य गुरू करतात. मुलांच्या जडणघडणीत गुरुचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे भारतीय संस्कृतीत गुरुंना मानाचे स्थान आहे.
भारताचे द्वितिय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबर हा “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.भारतीय इतिहासात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहावे असे आहे. भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक,थोर तत्त्वज्ञ,महान विचारवंत म्हणून शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरूजनांबद्दल आदराची व कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. गुरूंची महत्वपूर्ण भूमिका म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या मनात शिक्षकाबद्दल आदरभाव निर्माण व्हावा. शिक्षक हेच दैवत आहेत. ते देशाचे महान शिल्पकार आहेत ही भावना भावी पिढीत निर्माण करणे .
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सांगण्यावरून सर्वप्रथम १९६२ ला भारतामध्ये “शिक्षक दिन ” साजरा केला. “माझा जन्म दिवस शिक्षक दिनाच्या रूपात साजरा करावा म्हणजे माझ्यासाठी गौरवास्पद असेल.”
गुरू- शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता,ऋण व्यक्त करण्याचा दिन म्हणजे शिक्षक दिन. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकाप्रती असलेले प्रेम,आदर पाहून त्यांचा जन्म दिवस “शिक्षक दिन “म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. राष्ट्र उभारणीत देशातील शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. देशाच्या भविष्याचा पाया शिक्षकांमुळेच मजबूत होऊ शकतो.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८रोजी आंध्र प्रदेशातील तिरुताणी या गावी ब्राह्मण कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावातचं झाले. तत्त्वज्ञान,संस्कृत व गणीत हे विषय आवडते होते. शिक्षक,प्राध्यापक,कुलगुरू, उपराष्ट्रपती,राष्ट्रपती असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन महान विचारवंत, साहित्यिक व तत्वज्ञ होते. शिक्षक समाज परिवर्तन करणारा महत्त्वापूर्ण घटक आहे.
भविष्यात विचारवंत,कलाकार, लेखक,तत्त्वज्ञ,पुढारी,डाॅक्टर, प्राध्यापक,इंजिनिअर,शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते.
ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करीत असतो. अगदी त्याचप्रमाणे बालकाच्या को-या मनावर योग्य संस्कार करून भविष्यातील जबाबदार नागरिक घडविण्याचे योगदान असते.
आई वडीलानंतर शिक्षक हे अप्रत्यक्ष पालकच असतात. शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान देत नसून जीवन जगण्याची कला शिकवतात.मुलांच्या व्यक्तीमत्वात संस्कार,संस्कृती, परंपरा,चालीरिती व आदर असे विविध पैलू रुजवण्याचे पवित्र कार्य केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यानी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. गुरू हे देशाचे भाग्यविधाते असतात. रविंद्रनाथ टागोर,साने गुरुजी,आचार्य विनोबा भावे,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या सारखे महाराष्ट्राचे वैचारिक अधिष्ठान असणारे महान गुरू साक्षात विद्यापीठ होय. संपूर्ण जमीनीचा कागद,समुद्राची शाई व वनराईची लेखनी केली तरी ही गुरूचा महिमा संपत नाही. गुरू हे अपार ज्ञानाचे भांडार असतात. ते विद्यार्थ्यांसाठी “कल्पवृक्ष” तथा “कामधेनू” असतात. शिष्यांना लागलेली ज्ञानाची तहान तृप्त करण्याचे अनमोल कार्य गुरू करतात. गुरू हे जीवनातील “इंद्रधनूष्य” असतात. शिष्यांचे भावी आयुष्य उज्वल बनवण्यासाठी ते “परिस” म्हणून भूमिका बजावतात. परिसाने लोखंडाला स्पर्श केला की सोने होते. तसेच विद्यार्थ्यांवर गुरूची कृपादृष्टी असली की जीवन सुंदर घडते. संत तुकाराम महाराज हे शिवरायांचे गुरू होते.थोर महापुरूष गुरू कृपेने यशस्वी झाले. गुरू हे दीपस्तंभ म्हणून मार्ग दाखवण्याचे अमुल्य कार्य करतात. आई वडील हे जीवनातील पहिले गुरू असतात. गुरूशिवाय तरोणपाय नाही. गुरू हे संस्काररुपी ज्ञानाची शिदोरी देतात. भारतीय संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
रत्नाकर बाबुराव पाटील
{पर्यवेक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता.जि. धाराशिव
मो.९४०३३९४८१८.


