{रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी} वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध कृषी तज्ञ म्हणून नाव लौकिक मिळवलेले महान व्यक्तिमत्त्व. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावात १ जूलै १९१३ रोजी सधन शेतकरी कुटुंबात झाला. वडील फुलसिंग नाईक व
आई हुणकीबाई. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात खेड्यात झाले. माध्यमिक शिक्षण अमरावती येथे तर उच्च शिक्षण नागपूर येथील मॉरिस कॉलेजमधून झाले. ते बी.ए.एल. एल. बी. झाले. विद्यार्थी असताना त्यांच्यावर जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला.नागपूरमध्ये असताना त्यांची घाटे या ब्राह्मण कुटुंबाशी ओळख झाली.१९४१ ला वत्सला या ब्राह्मण मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. वत्सला ही पदवीधर होत्या.सामिजिक कार्यात सहभागी,महिला सक्षमीकरण,महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिला जनजागृती केली.कोर्टात वकील म्हणून कर्तव्य करताना गरीब लोकांची कामे करून एक वेगळी ओळख निर्माण केली. आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक बांधिलकी जपणारे वकील म्हणून भुमिका पार पाडली.नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास होता. सर्वाधिक काळ लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली. हरितक्रांती, पंचायत राज, श्र्वेतक्रांती, रोजगार हमी याचे जनक मानले जातात. सिंचनाचे स्रोत निर्माण करून शेतकऱ्यांच्या जीवनात यशस्वी हरितक्रांती केली. कृषी प्रधान संस्कृतीचा वसा उचलून अनेक कृषी योजना लागू केल्या. वसंत बंधारे, पाझर तलाव निर्माण करून सिंचनक्षेत्र वाढवले. शेती आणि शेतकरी यांची अतूट नाळ सातत्याने जोडली गेली होती. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असता अनेक रोजगार हमी योजना राबवून दुष्काळावर मात करून दाखवली. शेतकरी सुधारला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून धाडसी निर्णय घेतले. वसंतराव नाईक यांना गोरगरीब शेतकरी जनता “जाणता राजा,” “हरितयोद्धा” म्हणून ओळखतात . शेतकरी, कामगार, मजूर यांचे जीवनमान उंचावले पाहिजे यासाठी सतत धडपड करणारे एक महान नेता.वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्याच्या कार्यकाळात महाराष्ट्रात हरितक्रांतीने प्रचंड बदल झाला. रोजगार हमी योजना सुरू करून गोरगरिबांना रोजगार उपलब्ध करून दिला. पाझर तलाव व वसंत बंधारे या प्रकल्पामुळे पाण्याची उपलब्धता वाढली. महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्यात वसंतराव नाईक यांचे बहुमोल योगदान आहे. कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या हरितक्रांतीच्या जनकास कोटी कोटी वंदन.
रत्नाकर बाबुराव पाटील
{पर्यवेक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा, शिंगोली ता.जि.धाराशिव


