[रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी] “कांदा मुळा भाजी |
अवघी विठाबाई माझी ||
लसूण,मिरची,कोथंबिरी|
अवघा झाला माझा हरी ||”
ईश्वराचे अस्तित्व हे चराचरात सामावले आहे. जळी ,स्थळी ,काष्टी, पाषाणी ईश्वर भरून उरला आहे. भाव तिथे देव. श्रद्धा व निष्ठेने भजन केले की देव प्रसन्न होतो. भगवंत भक्तीचा भुकेला आहे. ईश्वर शोधण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. आपण करत असलेल्या कर्मात देव आहे. कर्म करत रहा देव नक्की भेटेल. असे परखड मत संत सावता महाराजांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरणभेंडी नावाचे गाव. या गावात वारकरी व शेतकरी कुटुंबात सावता महाराजांचा जन्म झाला. वडील पुरसोबा माळी पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते.वडीलाप्रमाणे सावता ही शेतकरी वारकरी होते. ते आपल्या मळ्यात काम करीत असताना पांडुरंगाची भक्ती करीत. स्वतः चा मळा हा पंढरी समजून पंढरपूरी न जाता मळ्यात राहून विठठ्लाची भक्ती केली.
देव कार्यात आहे. काम सोडून विनाकारण तिर्थक्षेत्र करण्याची आवश्यकता नाही. संतघरी जन्म झाल्यामुळे सतत विठ्ठल, विठ्ठल. सावता महाराजांनी भक्तीचा मळा फुलविला.
” मोट नाडा विहीर दोरी |
अवघी व्यापिली पंढरी||
सावता म्हणे केला मळा |
विठ्ठल पायीं गोविंला गळा ||
मळ्यात कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथंबिरीची लागवड करून विहीरतील पाणी मोटेद्वारे बैलाच्या साह्याने देत. सुंदर मळा विठ्ठल नामाच्या भजनात दंग राहून फुलविला. विठ्ठल नाम घेता भाव महत्त्वाचा असतो. मुर्तीपूजा, कर्मकांड करण्यापेक्षा भक्तीभाव महत्त्वाचा आहे. माळी घराण्यात जन्मलेल्या सावता महाराजांनी भक्तीचा मळा शेतकरी बनून शेतात निर्माण केला. मानवता हाच धर्म खरा आहे. कर्तव्य चांगले असेल तर, फळ ही चांगले मिळते. आपण करीत असलेले काम श्रद्धा व निष्ठेने केले हीच खरी ईश्वराची आराधना आहे. लोकांच्या मनातील अंधश्रद्धा निर्मूलन, प्राचीन रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी अनेक भजने लिहिली आहेत. अंधश्रद्धारूपी तण उपटून भक्तीरूपी पिक जोरात आणले. शेती ही आपली काळी आई सोणं पिकवीते.तिची मशागत योग्य प्रकारे करावी. ती आपणास भरभरून देते. काळ्या आईची सेवा करण्यात खरी विठ्ठल भक्ती आहे. पंढरपूर जवळ असताना सुद्धा ते काम धंदा सोडून पंढरीस कधीही गेले नाहीत. अनेक संतानी पंढरीची वारी केली. वाळवंटी कीर्तन, भजन, प्रवचन केले. या संताच्या मांदियाळीत सावता महाराज कधीही गेले नाहीत. ते मळ्यात काम करत कांद्यात, मुळ्यात, भाजीत देव पाहायचे. माझा मळाचं मला पंढरी आहे. मग मी कशाला पंढरी जाऊ.
गुरेढोरे, शेतातील पिके, पिकांना सुकू न देता सतत मोटेंनी पाणी देत. भरपूर प्रमाणात पिक निघाले की गोर- गरीबांना मदत करीत. मळ्यात काम करीत – करीत भगवंताचे नाम घेत. नामाचा महिमा अपार आहे. पंढरीचा विठ्ठु साक्षात सावता माळीच्या मळ्यात भेटण्यासाठी आले. सोबत संत ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज होते. सांगितले जाते की, साक्षात परब्रह्म विठ्ठल पैठणचे विकलांग भक्त कुर्मदास यांना भेटण्यास निघाले असता सावतोबा च्या मळ्यात थांबले. कुर्मदासाची भक्ती व सावताची भक्ती पाहून देव प्रसन्न झाले. आषाढी एकादशीला अनेक संताच्या पालखी पंढरपूरला चालत येतात. आळंदीवरुन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, देहूचे संत तुकाराम महाराज यांची पालखी, संत निवृतीनाथ, जनाबाई, संत सखुबाई, संत गोरोबा काका अशा अनेक पालखी पंढरपूरला येतात. लाखोंच्या संख्येने वारकरी पाऊल खेळत, नाचत पायी दिंडीत चालत पंढरीस येतात. संत सावता महाराजांच्या भेटीस आज सुद्धा साक्षात विठ्ठल अरणभेंडी गावी दरवर्षी येतात. सावता महाराजांना दर्शन देऊन पंढरीस जातात. संत सावता महाराज मळ्यात खुरपणी करीत असताना. खुरप्याने हृदय चिरले व आत पांडुरंगास बसविले.
“हृदय बंधी खाणा केला
आत विठ्ठल कोंडीला.”
हाताने चिपळी,टाळ व मुखाने विठ्ठल,विठ्ठल नामाचा जयघोष करीत अहोरात्र मळ्यात कष्ट करणारा महान संत सावता महाराज.
“आमुची माळियाची जात
शेत लावू बागाईत||
आम्हा हाती मोट नाडा| पाणी जाते फुलझाडां||
शांति शेवंती फुलली|
प्रेम जाई जुई व्याली ||
सावताने केला मळा|
विठ्ठल देखियला डोळा ||
रत्नाकर बाबुराव पाटील
[पर्यवेक्षक]
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता.जि . धाराशिव


