[रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी] भारत देश हा साधु संतांचा देश म्हणून ओळखला जातो. अनेक अवतारी संतानी लोककल्याणकारी कार्य भारत देशात केले आहे. समाज जागृती, ईश्वर भक्ती, नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन या विविध धार्मिक कार्यामुळे संस्कृती सजीव राहिली. संतांचे विचार समाजात जनजागृती करणारे असतात. संत गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत नरहरी,संत सावता महाराज,संत सेना महाराज या अनेक संतापैकी संत रविदास महाराज एक महान संत.रविदास महाराज यांचा जन्म सुमारे इ. स. १३७७ मध्ये झाला असावा असे म्हणतात.भारतभर देशाटन करून समाज प्रबोधन करण्याचे महान कार्य केले.सुधारक संतामध्ये ते प्रमुख होते. प्रख्यात कवी म्हणून त्यांची ख्याती होती. समाजातील एक महान विद्वान व कुलभूषण कवी होते.रविदास महाराज यांचा जन्म काशी बनारस जवळील गोवरधनपूर नावाच्या गावात झाला. आज श्री रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. संत रविदास महाराज यांच्या आईचे नाव घुरबिनिया तर वडिलांचे नाव रामरघु होते. हे चर्मकार कुटुंब होते. चमड्याचे काम ते दररोज करत होते.त्यांनी आपले आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायामध्ये घालवले. सूफी संत , साधु व तपस्वी लोकांच्या सान्निध्यात घालवले. रविदासचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होते. रोहिदास सतत भक्तीत दंग असल्यामुळे घरातील कामधंद्यात मन रमत नव्हते. भगवंत भक्तीच्या वेडात चामड्याच्या धंद्यात व संसारात प्रचंड नुकसान होऊ लागले.वडीलांनी रविदासाला घराच्या बाहेर हाकलून दिले. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत झोपडी करून रविदास रहायला लागले. गुरू रामानंद यांच्या भेटीमुळे रविदासाचे जीवन बदलले. रविदासाचे ज्ञान भांडार वाढले. ते प्रवचन करू लागले. वेद, उपनिषद व दर्शनशास्त्र या विषयावर बोलू लागले. रविदास एक महान संत म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यात प्रवचन करू लागले. हिमालयातील हिंदू तीर्थक्षेत्राला अनेक वेळा भेटी दिल्या. परमेश्वराचे सगुण रूप सोडून निर्गुण निराकारी रूप स्विकारले. शीखांचे धर्मगुरु गुरू नानक यांची भेट घेतली. “गुरुग्रंथ साहेबा” या पवित्र ग्रंथात ४१ कविता रविदासाच्या आहेत. भारत देशातील धार्मिक परंपरेतील सतरा संतापैकी रविदास एक महान संत होऊन गेले. संत रविदास यांचे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्य अनमोल ठेवा आहे. संत रविदास यांचे अनेक वचन प्रसिद्ध आहेत. “मन चंगा तो कठौती मे गंगा..!” संत रविदास महाराज यांचे मित्र स्नानासाठी गंगा नदीवर चालले असताना रविदास महाराज यांना ते सोबत घेऊन जाण्यासाठी आले तेंव्हा ते म्हणाले होते.शुद्ध व सात्विक आचरण असेल तर गंगेत आंघोळ करण्याची काय गरज…! मन पवित्र व निर्मळ असेल तर गंगेत स्नान करण्याची आवश्यकता नाही. संत रविदास महाराज हे १५ ते १६ व्या शतकाच्या दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवी होते. रविदास महाराज यांनी जातीयता व लिंग सामाजिक भेदभाव हटवण्याचा प्रयत्न केला. रविदास महाराज यांचे व्यक्तीत्व व कृत्वित्व सतत समाजाला प्रेरणादायी राहिल.
======================= रत्नाकर बाबुराव पाटील
( पर्यवेक्षक)
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा
शिंगोली ता.जि.धाराशिव.


