[रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी]
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला “गुरू पौर्णिमा” म्हणतात.या दिवसी गुरूजनांचा व आध्यात्मिक गुरूंचा आदर,साधु संताचा सन्मान केला जातो. त्यांना फुले,प्रसाद देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरू पौर्णिमा. गुरू पौर्णिमा हा हिंदू,जैन व बौद्ध धर्माचा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो.
गुरू पौर्णिमेचा अर्थ असा सांगितला जातो की “गु” म्हणजे अंधकार, अज्ञान,अंधश्रद्धा आणि “रू” म्हणजे त्याचा नाश किंवा नायनाट करणारा. गुरू हे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ असतो. पौर्णिमा म्हणजे “प्रकाश” आणि गुरूपौर्णिमा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा दिवस. गुरू पौर्णिमेचे महत्त्व अतिशय प्राचीन काळापासून चालत आले आहे. महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. वेदांचे विभाजन करणारे महान तपस्वी महर्षी होते. त्यांना आदराने “व्यास” म्हटले जाते. महर्षी व्यासांनी भागवत पुराणासारखे महत्त्वाचे धार्मिक साहित्य लिहले. अतिशय महत्त्वाचे ज्ञान शिष्यांना दिले. या कारणांमुळे गुरू पौर्णिमा हा दिवस “ज्ञानदानाचे प्रतिक” म्हणून साजरा केला जातो. गुरू पौर्णिमा हा दिवस गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आशीर्वाद घेण्याचा दिवस. गुरू पौर्णिमा उत्सव साजरा करताना या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटण्यासाठी जातात. त्यांचे पूजन करून सन्मानपूर्वक फुले फळे, प्रसाद किंवा इतर भेट वस्तू अर्पण करतात. शाळा,महाविद्यालयात विद्यार्थी विशेष कार्यक्रम आयोजित करून गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. गुरू पौर्णिमा हा दिवस फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही तर सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने ही अतिशय महत्त्वाचा आहे. गुरू शिष्यांची परंपरा जपली जाणारा हा अनमोल दिवस आहे.गुरू पौर्णिमा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो. भारत, नेपाळ व भूतान देशाच्या हिंदू, जैन व बौद्ध धर्माचे लोक गुरू पौर्णिमा साजरी करतात.
“गुरूर् ब्रम्हा गुरूर् विष्णू, गुरू देवो महेश्वर:|
गुरूर् साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नम:||”
आध्यात्मिक गुरूंचा आदर,सन्मान करण्यासाठी या दिवसाचे महत्व आहे.
गुरू हा एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी,तपस्वी,आदरणीय असतो.
,महर्षी व्यास तसेच बौद्ध धर्माचे गुरू गौतम बुद्ध,जैन धर्मातील गुरू वर्धमान महावीर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. रवींद्रनाथ टागोर, डॉ.राधाकृष्णन, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी ,ए.पी.जे.अब्दुल कलाम अशा अनेक गुरूवर्यांना वंदन करून कृतज्ञता व्यक्त करतो.
रत्नाकर बाबुराव पाटील
[पर्यवेक्षक]
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा शिंगोली ता.जि. धाराशिव




