साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न!
*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून
*एका वर्षात सव्वा सहा कोटींच्या ठेवी, तर सव्वा सात कोटींचे खेळते भांडवल; सभासदांना पुढील वर्षापासून लाभांश देण्याचा वसंतराव जगताप यांचा विश्वास*
बेल्हे (ता. जुन्नर) : साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बेल्हे या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेने अवघ्या एका वर्षात सव्वा सहा कोटी रुपयांच्या ठेवी आणि सव्वा सात कोटी रुपयांचे खेळते भांडवल उभारून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा चेअरमन माननीय वसंतराव जगताप ऊर्फ अण्णा यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष वसंतराव जगताप ऊर्फ अण्णा, उपाध्यक्ष टी. एल. गुंजाळ सर, सचिव संजय विश्वासराव, तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते, दिग्दर्शक व लेखक रामदासजी राऊत सर, आळकुटी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन महेश ऊर्फ बंडू शिरोळे, लोकशाहीर विलास अटक, अभिनेते रमेश खाडे, रोहिदास पाबळे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आणि सेवकवृंद उपस्थित होते.
प्रथम वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप ऊर्फ अण्णा म्हणाले की, संस्थेची स्थापना झाल्यापासून सर्व संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले. सभासदांचा विश्वास, ठेवीदारांचे सहकार्य आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीमुळे संस्थेने एका वर्षात सव्वा सहा कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला असून, संस्थेचे खेळते भांडवल सव्वा सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
सर्व संचालक मंडळाने घेतलेल्या मेहनतीमुळे संस्था अल्पावधीत नावारूपाला आली आहे. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक सभासदाला योग्य कर्जपुरवठा, आवश्यक आर्थिक सुविधा आणि उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच पुढील वर्षापासून दिवाळीच्या मुहूर्तावर सभासदांना लाभांश (डिव्हिडंड) देण्याचा आमचा मानस असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संस्थेवर विश्वास ठेवून अनेक लोककलावंतांनीही निःस्वार्थ भावनेने ठेवी ठेवल्या आहेत. त्यांचे सहकार्य संस्थेसाठी मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांकडून संस्थेला शुभेच्छा!
यावेळी तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते, दिग्दर्शक व लेखक रामदासजी राऊत यांनी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आळकुटी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन महेश ऊर्फ बंडू शिरोळे यांनीही संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सेवकवृंद यांनी उपस्थित पाहुण्यांसाठी चहा-पाण्याचे आयोजन केले होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि आनंदी वातावरणात साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.



