*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोज कर यांच्याकडून
निघोजच्या साहित्यविश्वाचा गौरव; सुजन फाउंडेशनच्या स्पर्धेत उल्लेखनीय : सुजन फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले विचार अभियानांतर्गत आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन व जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील कवी नाना ढवळे यांनी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे निघोजच्या साहित्य क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक कवी, साहित्यिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काव्यलेखनाच्या माध्यमातून सामाजिक समता, मानवता, बंधुता, शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि स्वच्छता अशा महत्त्वपूर्ण मूल्यांचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
या स्पर्धेतील यशाबद्दल कवी नाना ढवळे यांचे सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव यांनी अभिनंदन केले. त्यांच्या साहित्यिक योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या यशामुळे निघोज परिसरातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सामाजिक परिवर्तनासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम असून, अशा स्पर्धांमुळे नवोदित कवी, लेखक आणि विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. कवी नाना ढवळे यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




