दोषींना कठोर शिक्षा द्या, मास्टरमाइंडचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक नेमा – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मागणी!*ज्येष्ठ पत्रकार संपादक मुकुंद निघोज कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
डॉ. विश्वासराव आरोटे आक्रमक; “पत्रकारांवर हल्ले सहन केले जाणार नाहीत”
संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उघड; पत्रकारांमध्ये संतापाची लाट!
दोन एकर संस्थेच्या जागेसाठी रचला जीवघेणा कट? तीन आरोपी अटकेत!
संजय भोकरे यांना झेड प्लस सुरक्षा द्या; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मागणी!
पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; जिल्हानिहाय आंदोलनाचा इशारा!
भोकरे परिवाराला लक्ष्य करण्यामागे मोठे षड्यंत्र? गृह मंत्रालयाने हस्तक्षेप करावा!
“आज संजय भोकरे, उद्या कोणताही पत्रकार” – पत्रकार संघाचा इशारा!
✍🏻डॉ. विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून
ज्येष्ठ पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक तसेच श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष
मार्गदर्शक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील पत्रकारांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. पत्रकारिता, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या भोकरे परिवाराला लक्ष्य करून काही समाजकंटकांनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कटामागील खरा मास्टरमाइंड शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केली आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना डॉ. विश्वासराव आरोटे यांनी अत्यंत संतप्त शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, संजय भोकरे यांनी आयुष्यभर सर्वसामान्य पत्रकारांसाठी संघर्ष केला. ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करून त्यांना न्याय, सन्मान आणि ओळख मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे. महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, बेळगाव आणि गुजरातसह विविध राज्यांमध्ये पत्रकार संघटनांचे जाळे उभे करून हजारो पत्रकारांना त्यांनी दिशा दिली.
डॉ. आरोटे म्हणाले की, “संजय भोकरे हे केवळ पत्रकार नाहीत, तर ते पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व आहे. त्यांनी अनेकांना उभे केले, संघटनांना बळ दिले आणि पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य घालवले. अशा व्यक्तीवर जीवघेणा कट रचला जाणे ही संपूर्ण पत्रकारितेसाठी धोक्याची घंटा आहे.”
दोन एकर संस्थेच्या जागेसाठी रचला कट?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित दोन एकर जागा ही कोणत्याही व्यक्तीची खासगी मालमत्ता नसून संस्थेची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. ही जागा हस्तगत करण्यासाठीच काही मास्टरमाइंड लोकांनी संजय भोकरे यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
या कटामध्ये सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, चौकशीत सुपारी देणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आल्याची माहिती आहे. मात्र या संपूर्ण कटामागे आणखी मोठा सूत्रधार असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या दिशेने तपास अधिक वेगाने करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून केली जात आहे.
डॉ. आरोटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भोकरे हे या मालमत्तेच्या गैरव्यवहारात अडसर ठरत होते. त्यामुळे त्यांना कायमचे संपवून जागा बळकावण्याचा प्रयत्न झाला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा कट उधळला गेला. अन्यथा राज्याने एक निर्भीड पत्रकार गमावला असता.”
सिद्धार्थ भोकरे यांनाही यापूर्वी धमक्या:
डॉ. आरोटे यांनी यावेळी आणखी एक धक्कादायक माहिती दिली. डिजिटल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनाही काही महिन्यांपूर्वी पुण्यावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे भोकरे परिवाराला नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
“पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि शैक्षणिक क्षेत्रात भोकरे परिवाराने मोठे कार्य उभे केले आहे. अनेक वर्षांच्या संघर्षातून त्यांनी संस्था उभ्या केल्या. त्यामुळे काही समाजकंटकांच्या डोळ्यात ते खुपत होते,” असे डॉ. आरोटे म्हणाले.
“पत्रकार सुरक्षित नसतील तर लोकशाही धोक्यात”
पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करताना डॉ. आरोटे यांनी शासनावरही टीका केली. “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जर पत्रकारांनाच संरक्षण नसेल, तर लोकशाही सुरक्षित राहणार नाही. आज संजय भोकरे यांच्यावर ही वेळ आली आहे; उद्या राज्यातील कोणत्याही पत्रकारावर येऊ शकते,” असे ते म्हणाले.
त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना उद्देशून म्हटले की, “या प्रकरणाचा तपास केवळ औपचारिक राहू नये. या कटामागील प्रत्येक सूत्रधार बाहेर आला पाहिजे. यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून स्वतंत्र चौकशी करावी.”
झेड प्लस सुरक्षेची मागणी:
संजय भोकरे यांच्या जीवाला अजूनही धोका असल्याचे सांगत त्यांना उच्चस्तरीय सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. “ज्या पद्धतीने त्यांच्यावर कट रचला गेला, त्यावरून त्यांना अजूनही धोका आहे. त्यामुळे शासनाने त्यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा द्यावी,” अशी मागणी डॉ. आरोटे यांनी केली.
राज्यभर आंदोलनाचा इशारा:
या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकारांनी एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केले आहे. प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर निवेदने देऊन पत्रकार सुरक्षेचा मुद्दा लावून धरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
“आम्ही चांगल्याला चांगले म्हणतो आणि वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद ठेवतो. पत्रकारांवर अन्याय झाला तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शांत बसणार नाही,” असा इशाराही डॉ. आरोटे यांनी दिला.
पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर:
संजय भोकरे हत्याकट प्रकरणामुळे राज्यात पत्रकार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पत्रकारांवर वाढते हल्ले, धमक्या आणि दबावाच्या घटनांमुळे स्वतंत्र पत्रकारिता धोक्यात येत असल्याची भावना पत्रकार संघटनांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा होऊन खरा मास्टरमाइंड समोर येतो का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


