व
वसुंधरा विकास प्रतिष्ठान, देवीभोयरे ——————————————-
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
संस्था हा एक आदर्श विचार असतो. त्या विचाराची जपणूक आणि संवर्धन या संस्था करीत असतात. गावातील ग्रामपंचायत, सहकारी पतसंस्था, दूध डेअऱ्या, शाळा, प्रशाळा अशा विविध संस्था आपला आर्थिक, शैक्षणिक विचार पुढे नेता नेता गावाचा सामाजिक विकास करीत असतात.
देवीभोयरे (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील वसुंधरा विकास प्रतिष्ठान ही अशीच एक समाजसेवी संस्था आहे. या संस्थेची स्थापना २०१९ साली झाली. सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील ज्येष्ठांचा सत्कार करणे, संविधान दिन साजरा करणे, गावातील शाळकरी मुलांच्या वर्षा सहली काढून वनभोजनाचे कार्यक्रम आयोजित करणे असे सामाजिक उपक्रम या संस्थेतर्फे राबविले जायचे.
२०२१ पासून या संस्थेने वृक्षारोपणाचा प्रकल्प हाती घेतला. वनखात्याच्या अखत्यारीतील साधारणतः पाच एकर जमिनीवर आतापर्यंत वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. या वृक्षरोपांच्या हुंड्या वनखात्याकडून पुरविल्या जातात. येथे लागवड केलेल्या रोपांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दादाभाऊ तबाजी मुळे आणि सुरेश विष्णू मुळे यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे. दरवर्षी आंबा, पेरू, जांभूळ, चिंच, बेल, करंज, वड, पिंपळ अशा ४०० ते ५०० वृक्षरोपांची लागवड येथे केली जाते. बांबूचीही लागवड येथे केली जाते. २०२५ पासून गावातील ज्या ग्रामस्थ व्यक्तींचे वाढदिवस १ जून रोजी येतात अशांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तसा सार्वजनिक वाढदिवसाचा आता पायंडाच पडला आहे.
गेल्या १ जून रोजी या गावात सार्वजनिक वाढदिवसाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या दिवशी गावातील आबालवृद्धांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी गावातील इन्स्पायर क्लासच्या २५ विद्यार्थ्यांचे विशेष योगदान लाभले.
या कार्यक्रमात चहानाश्त्याची व्यवस्था होती. वाढदिवसाच्या सत्कारमूर्तींच्या स्नेहार्थ उपस्थितांना पेढेही वाटण्यात आले.
या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी पांडुरंग सखाराम बेलोटे, भालचंद्र तबाजी मुळे, भास्कर केशव बेलोटे, अशोक मुळे, सुभाष बेलोटे, शिवाजी जाधव, विकास सावंत, इन्स्पायर क्लासचे विद्यार्थी आणि इतर महिलापुरुष ग्रामस्थ हजर होते. सगळ्यांचीच नावे देणे इथे शक्य होणार नाही. इथे ज्या पदाधिकाऱ्यांची नावे दिली आहेत त्यांनाही हे रुचणार नाही याची मला जाणीव आहे. मीही या कार्यक्रमास हजर असून माझेही नाव मी या नामावळीत दिले नाही. यावरून नाराज असणाऱ्या ग्रामस्थांनी यातून योग्य तो बोध घ्यावा.
प्रदूषणाचा भस्मासूर गाडण्यासाठी भारतातल्या समस्त गावागावांतून असे वृक्षारोपणाचे प्रकल्प राबविले गेले तर किती बरे होईल? मानवाला शुद्ध प्राणवायू आणि पुरेसे पर्जन्यमान मिळण्यासाठी आज अशा बृहत् हरित क्रांतीची साऱ्या जगालाच सक्त गरज आहे. त्या दृष्टीने देवीभोयरे येथील वसुंधरा विकास प्रतिष्ठानने उचललेले हे एक पाऊल मार्गदर्शक ठरावे.
नाना ढवळे
८२८६९१३२२३
निघोज, ता. पारनेर,
जि. अहिल्यानगर.


