*जिल्हा प्रतिनिधी अशोक सूर्यवंशी यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
अहिल्यानगर : महिला आर्थिक विकास महामंडळ, अहिल्यानगर अंतर्गत कार्यरत अहिल्याबाई लोकसंचलित साधन केंद्र, मिरजगाव यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोकणगाव येथे वृक्षारोपण व बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात जिल्हा प्रकल्प सल्लागार माने सर यांनी उपस्थितांना बायोगॅस योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच शेळीपालन, सेंद्रिय व पर्यावरणपूरक खतांचा वापर, शाश्वत शेती आणि ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी उपलब्ध विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक उपक्रम स्वीकारून नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सीएमआरसीच्या अध्यक्षा नेटके मॅडम यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि बदलते हवामान यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत उपस्थितांना जागृत केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करत त्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा प्रेरणादायी संदेश दिला.
मॅनेजर श्रीकांत चव्हाण यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता व्यक्त केली. ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच घरगुती पोषण सुरक्षेसाठी परसबागेचे महत्त्व सांगून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी “उत्कृष्ट परसबाग स्पर्धा” आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राचे विकास थोरवे सर व प्रीती गायकवाड यांनी विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती दिली. नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपलब्ध होणाऱ्या आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, नियमित आरोग्य तपासणी करावी तसेच शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एलडीसी सतीश पवार तसेच सहयोगिनी स्वाती गाडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना विविध प्रकारच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथही देण्यात आली.
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि ग्रामीण महिलांच्या सहभागातून हरित भविष्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


