लोकराजा: छत्रपती राजर्षी शाहू महाराज
[रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी] महाराष्ट्र ही साधुसंत,क्रांतिकारक, समाजसुधारक व लढवय्या शूरवीरांची भूमि म्हणून ओळखली जाते. फुले, शाहू व आंबेडकर या महान समाजसुधारकांच्या कार्यातून साकारलेली भूमी महाराष्ट्र होय. या पवित्र मातीत कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीविलास राजवाडा, कसबा बावडा येथे २६ जून१८७४ ला शाहू महाराजांचा जन्म झाला. वडील आबासाहेब घाटगे तर आई राधाबाई.
शाहू महाराज लहानपणी अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी समाज सुधारक ,यशस्वी राजा म्हणून आपली काया झिजवली. शिक्षणाचा प्रसार- प्रचार प्रभावीपणे करीत समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मातीचे धरण बांधून “पाणी आडवा पाणी जिरवा” ही संकल्पना सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेचा व बुद्धीचा विचार करून शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू केली. त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले.छत्रपती शाहू महाराज हे लोकहितवादी व मानवतावादी विचारसरणीचे होते. प्रजेचे हित करणारा “प्रजाहितेशी प्रेमळ राजा” म्हणून ओळख होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक पुरोगामी धोरणे व योजना राबविण्यात आल्या.शाहू महाराज एक सक्षम राजकर्ते होते. इ. स. १८९४ ला त्यांचा राज्याभिषेक झाला. तेंव्हा पासून राज्यातील बहुजन, मागास जातीतील लोकांसाठी काम केले. जाती धर्म पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे महत्त्वाचे कार्य होते. ब्रिटिश राज्यसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी भरीव कामगिरी केली. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून करून दिली. सनातनी लोकांच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. शाहू महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी “राजर्षी” ही पदवी क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्रचे वैचारिक अधिष्ठान असणारे फुले, शाहू व आंबेडकर या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वारसा लाभला म्हणून राज्याला फुले,शाहू व आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. शाहू महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवात विविध जनकल्याण योजनाच्या धडाकेबाज कार्यांने होती. त्यांना “छत्रपती” ही उपाधी बहाल करण्यात आली. शाळा तेथे वसतिगृह व गरीब मुलांना शिष्यवृत्तीची सुरूवात केली. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्य राज्यात प्रभावी राबवली. शाहू महाराजांच्या पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले होत्या. राजघराणे भोसले होते. पुढील उत्तराधिकारी छत्रपती राजाराम भोसले होते. मागासवर्गीय बहुजन लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी जुलै १९०२ रोजी ५० टक्के आरक्षण दिले. शेतीच्या विकासासाठी विविध धरण बांधण्यात आले. भटक्या जमाती च्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून वाड्या, तांडा व वस्तीवर शाळा सुरू केल्या. विधवा पुनर्विवाह संकल्पनेचा शुभारंभ केला. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा मोडीत काढून नवीन विचारांचा अंमल सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अनमोल वारसा रयतेचे कल्याण हा डोळ्यासमोर ठेवून कार्य केले. कोल्हापूर संस्थानात एक थोर राजर्षी, लोकराजा म्हणून नावलौकीक मिळवले. अशा छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला कोटी – कोटी वंदन.
रत्नाकर बाबुराव पाटील {पर्यवेक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा, शिंगोली ता. जि. धाराशिव.


