नेवासा तालुका प्रतिनिधी
बाळासाहेब बोधक
सौदाळा (ता. नेवासा) : आपल्या कर्तृत्वाने व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाने सौदाळा गावाचे नाव उज्ज्वल करणारे मुकेश आरगडे सर यांची जि.प. प्राथमिक शाळा भेंडा येथे केंद्रप्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल सौदाळा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांनी शाल, पुष्पगुच्छ व हार अर्पण करून मुकेश सरांचा सन्मान केला. त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना मुकेश आरगडे सर म्हणाले की, “मिळालेले पद ही समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे. या पदाचा उपयोग निश्चितच गाव, विद्यार्थी आणि समाजाच्या विकासासाठी करणार आहे. आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेतून प्रामाणिकपणे काम करत राहीन.”
तसेच आपल्या गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी मोफत मार्गदर्शन व क्लासेस सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राजेंद्र चामुटे, रघुनाथ आरगडे, नारायण आरगडे, सुदाम आरगडे, सुरेश आढागळे, बबन आरगडे, लक्ष्मण चामुटे, सुधीर आरगडे, मिनीनाथ आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मुकेश आरगडे सर यांच्या नियुक्तीमुळे सौदाळा गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी प्रेरणा निर्माण झाली असून, त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.


