हर घर तिरंगा अभियान
========================*रत्नाकर पाटील धाराशिव प्रतिनिधी
भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण देश अमृत महोत्सव साजरा करीत आहे. यापूर्वी तिरंगा ध्वज फक्त शाळा,कॉलेज, दवाखाना,पोष्ट,बॅंक,रेल्वे स्टेशन,बस स्थानक,शासकीय कार्यालये या ठिकाणी फडकवले जात होते. देशाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना घरोघरी तिरंगा म्हणजे सामान्य झोपडीपासून ते शानदार बंगाल्यापर्यंत फडकवण्याचे आदेश आहेत. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन तिरंगा ध्वज कसा लावावा याचे प्रशिक्षण दिले जाते आहे. तिरंगा ध्वज हा राष्ट्राचा मान सन्मान, स्वाभिमान आहे. तिरंग्याच्या छत्र छायेखाली संपूर्ण अखंड भारत एकसंघ आहे.तिरंगा हे राष्ट्रीय प्रतीक आहे. तिरंगा किती महत्वपूर्ण आहे हे सामान्य माणसाला कळणे आवश्यक आहे. देशापेक्षा कोणीही मोठा नाही. देशाची एकात्मता अबाधित रहावी म्हणून घरोघरी तिरंगा ध्वज लावण्यात यावा. यासाठी भारत सरकारने “हर घर तिरंगा” हे अभियान सुरू केले आहे.आपल्यातील जात,धर्म,पंथ हे सर्व भेदभाव विसरून आम्ही भारतीय आहोत ही भावना मनात मनात रुजवण्यासाठी तिरंगा लावणे आवश्यक आहे. देशप्रेम,देशभक्ती, राष्ट्रप्रेम,भाईचारा हे सद्गुण प्रत्येक भारतीयांच्या हृदयात जोपासने आवश्यक आहे. माननीय प्रधानमंत्री यांचे देशाला आहवान आहे. प्रत्येक नागरिकांने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविला पाहिजे. चला या अभियानात सहभागी होऊन राष्ट्र हिताचे ऐतिहासिक कार्य करू. अभियान अंतर्गत घरोघरी तिरंगा ध्वज फडकवून ध्वजाचा सन्मान करू. ध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊ. संपूर्ण भारत एक बलशाली बनवण्यासाठी संकल्प करू.संपूर्ण भारत देश तिरंगामय करू.
“बलसागर भारत व्होवो,
विश्वात शोभूनी राहो.”
१३ऑगस्ट ते १५ ऑगस्ट तीन दिवस घरोघरी राष्ट्रीय सण साजरा करू.
घरोघरी तिरंगा फडकवूण राष्ट्रीय अभियान यशस्वी करू.
घरोघरी जाऊन तिरंगा कशासाठी लावायचा याची जनजागृती करू. समाज प्रबोधन करून तिरंगा कसा लावावा याची माहिती देऊ. राष्ट्रीय कार्य समजून हे देश पातळीवरील अभियान यशस्वी करू.भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली पर्वानिमित्य जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात व जाज्वल्य भावना कायम स्वरूपात मनात रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उदेश्याने हे तीन दिवस साजरे करायचे आहेत.संपूर्ण भारत तिरंगामय करू. चला राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट नागरिक बनू या.
जय हिंद! जय भारत!
रत्नाकर बाबुराव पाटील [पर्यवेक्षक] विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता.जि. धाराशिव


