माती उत्खननसाठी ग्रामसभेच्या परवानगीची अट रद्द करणार;बावनकुळे
मंत्रालयात कुंभार समाजाच्या बैठकीत आश्वासन *पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून
*नाशिक :-* समस्या निवारणासाठी जिल्हा समिती स्थापन करण्याबरोबरच माती उत्खननसाठी ग्रामसभेच्या परवानगीची अट रद्द करण्याचे ठोस आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुंभार समाजाच्या नेत्यांना दिल्याने नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.सकल कुंभार समाज संस्थेचे अध्यक्ष संजय गाते,महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीश दादा दरेकर,प्रदेश अध्यक्ष रमाकांत भाऊ क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष सोमनाथ दादा सोनवणे यांचया नेर्तृत्वाखाली राज्यातील विविध कुंभार समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.यावेळी समाजाच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या माती उपलब्धतेसाठीच्या जमिनी,गाळ उपसा,विविध परवानग्या तसेच महसूल विभागाशी संबंधित अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.पारंपरिक मातीशिल्प व मातीभांडी व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय व आर्थिक अडचणी दूर करून त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुंभार समाजाच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली.पारंपरिक कारागिरांच्या अडचणी समजून घेत समाजाच्या न्याय्य मागण्यांवर शासनस्तरावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी
अखिल महाराष्ट्र कुंभार समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे,प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर भागवत,अनंत कुंभार,अशोक जाधव,भरत शिरसाठ,रवींद्र चौधरी,संजय रुईकर,सत्यवान वाळके,चंदन प्रजापती,सुभाष तेटवार,अनिल चित्ते आदिंसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. नागपूरच्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.त्या निवेदनाची दखल घेऊन मंत्री बावनकुळे यांनी मंत्रालयात चर्चेसाठी समाजाच्या नेत्यांना बोलावून घेतले होते.अशी माहिती प्रदेश अध्यक्ष श्री रमाकांत क्षीरसागर यांनी दिली आहे.


