गोष्ट १९२३ सालची आहे. बाबासाहेबांचं लंडनमधलं शिक्षण पूर्ण झालं होतं. मोठ्या कालावधीनंतर बाबासाहेब भारतात परतणार होते. रमाई डोळ्यात सगळा जीव एकवटून साहेबांची वाट पाहत होती. बाबासाहेबांचे मोठे भाऊ बाळाराम यांनी बाबासाहेबांचं भारतात येणं एखाद्या सणासारखं साजरं करण्याचं ठरवलं होतं. घरातल्या सगळ्यांना त्यांनी नवीन कपडे घेतले.
बाळाराम हे खरं तर भांडखोर होते. बाबासाहेबांशी त्यांचं कधी जमलं नाही. बाबासाहेब विदेशात असताना आंबेडकर कुटुंबाची अक्षरशः वाताहत झाली होती. बाळाराम मात्र आंबेडकर कुटुंबापासून विभक्त राहत होते. काही कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावलं. प्रदीर्घ काळानंतर बाबासाहेब भारतात येत आहेत म्हणून तेही कुटुंबाच्या सुखात सहभागी झाले होते.
रमाईनं एखादं चांगलं लुगडं घ्यावं म्हणून बाळारामांनी काही पैसे दिले. आपल्या साहेबांच्या सुखात रमाईनं स्वतःची सगळी सुखं विलीन केली होती. थोरल्या दिरानं लुगड्यासाठी दिलेल्या पैशातून रमाईनं बाबासाहेबांसाठी एक धोतरजोडी खरेदी केली. आपल्या बॅरिस्टर साहेबांना झोपण्यासाठी गादी घेतली, जेवायला बसयचा पाट विकत घेतला.
साहेब बॅरिस्टर होऊन भारतात आले. खूप लोक त्यांच्या स्वागताला आले होते. रमाईचं काळीज तळमळत होतं. एकच लुगडं अन तेही फाटकं. फाटकं लुगडं नेसून साहेबांच्या स्वागताला कसं जावं? लोक बॅरिस्टरची बायको फाटकं लुगडं नेसून आली म्हणतील. माझ्या साहेबांची मान खाली जाईल. अश्या अनेक प्रश्नांचं मोहळ रमाईच्या समोर उभं होतं.
अचानक तिला आठवलं. कुठल्यातरी एका सत्कारात छत्रपती शाहू राजानं बाबासाहेबांना जरीचा पटका दिला होता. तो पटका लोखंडी पेटीतून तिनं बाहेर काढला. लुगडं नेसावं तसं रमाईनं तो जरीचा पटका नेसला. अन मग आपल्या साहेबांच्या स्वागताला गेली.
कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण बॅरिस्टर झालेल्या बाबासहेबांनी तेवढ्या गर्दीत रमाईचं काळीज वाचलं. रमाईच्या डोळ्यातला व्याकुळ बुद्ध फक्त बाबासाहेबांनाच दिसला. हजारो लोकांचा गराडा भोवती होता. आभाळाला तडा जाईल एवढ्या मोठ्या आवाजात जयजयकार चालू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं काळीज मात्र डोळ्यातून सांडत होतं. अन ते फक्त रमाईचं पाहू शकत होती.
बाबसाहेब पहिल्यांदा कोलंबियाला गेले त्याच्या सहा महिने अगोदरच रामजी सुभेदार वारले होते. साहेब अमेरिकेत गेल्यानंतर वर्षाच्या आत रमेश नावाचा त्यांचा मुलगा वारला. या मुलाला बाबासाहेबांनी पाहिलं सुद्धा नव्हतं. या चार वर्षात रमाईचे फार हाल झाले. संसार चालवण्यासाठी शेण गोळा करून गवऱ्या थापल्या अन त्यावर घर चालविलं. मुलाच्या दुःखातून सावरली नाही तोवर बाबासाहेबांची सावत्र आई जिजाबाईंचं निधन झालं. बाबासाहेबांचे थोरले भाऊ आनंदरावही सोडून गेले. आनंदरावांचा एक मुलगाही काही दिवसातच वारला.
बाबासाहेब अन रमाईची मुलगी इंदू वर्ष-दीड वर्षाची असताना वारली. बाबासाहेबांचा तिसरा मुलगा गंगाधर औषधपाण्यासाठी पैसे नसल्यामुळं उपचाराविना दगावला. साहेबांना सर्वात प्रिय असणाऱ्या राजबिंड्या राजरत्न तर बाबासाहेबांच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतला. 1913 ते 1926 या तेरा वर्षात रमाईच्या डोळ्यातलं पाणी पार आटून गेलं होतं. संकटांची सलग एका पाठोपाठ एक अशी मालिकाच तिचा पाठलाग करीत होती. पण रमाई या संकटांना शरण गेली नाही.
1908 साली भायखळ्याच्या बाजार ओळीत रमाईचं बाबासाहेबांसोबत लग्न झालं. दहा वर्षाच्या रमानं अन 17 वर्षाचा भीमानं एकमेकांना मनापासून स्वीकारलं. वणंदगावच्या भिकू अन लक्ष्मी धुत्रेची लेक आंबेडकर झाली.
सुरुवातीचे चार पाच वर्षे घरात सुखाचा दरवळ होता. बाबासाहेब मॅट्रिक पास झाले, बीए झाले. संसाराच्या वेलीवर यशवंत नावाचं फुल उमललं. बाबासाहेबांना बडोद्यात नौकरी मिळाली. अन 1913 साल उजाडलं. सुरुवातीला सासरे रामजी सुभेदार अन त्याच वर्षी थोरले दीर आनंदराव वारले. रमाईवर दुःखाचा डोंगर कोसळला. संसाराचा सगळा भार तिच्या एकटीच्या खांद्यावर आला. सात वर्षाची होती तेव्हा तिचे आई-वडील तिला सोडून गेले होते. एवढ्या कोवळ्या वयात लहान भाऊ अन बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती. तेंव्हापासून तिच्या डोळ्याला कधीच पाणी आलं नव्हतं. येईल त्या परिस्थितिला शरण न जाता लढत राहणं एवढंच तिला माहीत होतं.
रमाई बाजरीच्या चार भाकरी करीत. त्यातली एक आनंदरावांचा मुलगा मुकुंद खात. एक पोटचा लेक यशवंताला देत. तिचा लहान भाऊ शंकरच्या वाट्याला एक भाकर येत. अन राहिलेली चौथी भाकर भावजयी लक्ष्मी, लहान बहीण गौरा अन रमाई तिघी मिळून खात. कधी-कधी तर सगळ्यांना फक्त रात्रीचंच जेवण मिळत. दारिद्र्य रमाईला असं खात होतं. पण ती कधीच पराभूत झाली नाही. तिनं शील अन स्वाभिमान कधीच सोडला नाही. जिच्या गळ्यात सोन्याचा एकही दागिना नव्हता, आज तीच रमाई कोट्यवधींच्या गळ्यातला दागिना बनलीय.
27 मे 1935 साली वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी रमाई कोट्यवधींचा उद्धारकर्ता असलेल्या बाबासाहेबांना सोडून गेली. त्यावेळी साहेब 44 वर्षाचे होते. रमाई एकदातरी पंढरपूरला घेऊन चला म्हणून बाबासाहेबांकडे सतत आग्रह धरत. बाबासाहेब तिची समजूत काढीत. “जो देव अन देऊळ केवळ आपल्या स्पर्शाने विटाळातात त्याला आपण देव मानायचं का?” असा रोकड सवाल उपस्थित करीत अन म्हणत, “रामू आपण आपलं स्वतःचं पंढरपूर तयार करू. जिथं सगळ्या माणसांना समान सन्मान असेल.” रमाईला आपल्या साहेबांचं म्हणणं पटायचं. बाबासाहेबांनी नागपुरात माईसाहेबांना सोबत घेवून 1956 साली निर्माण केलेलं उजेडाचं पंढरपूर मात्र रमाईला पाहायला मिळालं नाही.
आज त्यागमूर्ती माता रमाईची जयंती…जयंती निमित्त माता रमाईस विनम्र अभिवादन
