भेडा . येथील जिजामाता विद्यालयाची यशस्वी भरारी ; दहावीचा निकाल ८५.९२ टक्के
सार्थक दुकळे विद्यालयात प्रथम ; स्नेहल आरगडे द्वितीय तर पवित्रा चामुटे तृतीय — गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
नेवासा तालुकाप्रतिनिधी : बाळासाहेब बोधक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर पुन्हा एकदा यशाची पताका फडकावली असून भेंडा येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी मार्च २०२५ परीक्षेचा निकाल तब्बल ८५.९२ टक्के लागला आहे. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या परीक्षेस विद्यालयातून एकूण ३२५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २७६ विद्यार्थी यशस्वी झाले. विशेष प्राविण्य श्रेणीत ७६ विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून प्रथम श्रेणीत ९३, द्वितीय श्रेणीत ८४ तर पास श्रेणीत २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सार्थक अनिल दुकळे याने ५६३ गुण मिळवत ९२.६० टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. स्नेहल भारत आरगडे हिने ५६० गुण मिळवत ९२ टक्क्यांसह द्वितीय क्रमांक मिळविला. पवित्रा बाबासाहेब चामुटे हिने ५५७ गुणांसह ९१.४० टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच साक्षी राहुल ठोबरे हिने ५५६ गुणांसह चौथा तर सार्थक चंद्रकांत पडीत याने ५४४ गुणांसह पाचवा क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांची अथक मेहनत महत्त्वाची ठरल्याची भावना विद्यालय प्रशासनाने व्यक्त केली. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. नरेंद्र घुले पाटील, मुख्याध्यापक, श्री मुगसे सर शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील गुणवत्ता यादीत चमकू शकतात, हे जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा सिद्ध केले आहे,” अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.



