“ढोंगी महाराजांचा बाजार… श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक!”
लेखक – सुरेश पाटील, शेवगाव तालुका प्रतिनिधी यांच्याकडून
9975048371
आजच्या समाजात “महाराज” या नावाचा एक वेगळाच बाजार मांडला गेला आहे. संतांची परंपरा, कीर्तन-प्रवचनाची संस्कृती आणि अध्यात्माचा गाभा यांचा आधार घेत काही ढोंगी लोकांनी लोकांच्या श्रद्धेचा अक्षरशः व्यापार सुरू केला आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि संत परंपरेला काळीमा फासणारी आहे.
खऱ्या संतांनी समाजाला सत्य, प्रामाणिकपणा, परोपकार आणि साधेपणाचा संदेश दिला. संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितले आहे की, “दुसऱ्याच्या घरचा बुक्का घेऊ नये.” म्हणजेच अन्यायाने, फसवणुकीने मिळवलेले काहीही स्वीकारू नये. पण आजचे काही तथाकथित “महाराज” लाखो रुपये घेऊन लोकांना गंडा घालत आहेत. काही ठिकाणी तर अत्याचारासारख्या गंभीर घटना देखील समोर येत आहेत. हे चित्र अत्यंत लाजिरवाणे आहे.
अलीकडील घटनांमध्ये काही महाराजांनी लाखो रुपये घेऊन लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. जेव्हा हे प्रकार समोर येतात, तेव्हा त्यांच्या पाया खालची जमीन सरकते. पण तोपर्यंत अनेक निरपराध भक्तांची फसवणूक झालेली असते. श्रद्धेच्या नावाखाली चालणारा हा प्रकार थांबवणे अत्यावश्यक आहे.
आज लोकांना दोन शब्द संस्कृतमध्ये ऐकले की “काय ज्ञान आहे!” असा भास होतो. पण खरे ज्ञान हे वागण्यात, आचरणात आणि समाजसेवेत दिसते. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांच्या ग्रंथांमध्ये जे काही आहे, ते आपण स्वतः वाचले तरी जीवन समृद्ध होऊ शकते. त्यासाठी कोणाच्या पायाशी बसून पैसे देण्याची गरज नाही.
याउलट, समाजात अनेक गरजू लोक आहेत – वृद्धाश्रमातील वृद्ध, आजाराशी झुंज देणारे रुग्ण, शिक्षणासाठी धडपडणारे गरीब विद्यार्थी. या लोकांना मदत करणे हीच खरी सेवा आणि खरी भक्ती आहे. पण आपण मोठे मंडप, लाईट, डेकोरेशन, जेवणावळी यावर लाखो रुपये खर्च करतो आणि ढोंगी महाराजांना बिदागी देतो – ही एक मोठी विसंगती आहे.
आज वेळ आली आहे विचार करण्याची. आपण कोणाच्या पाया पडतो? आपल्या आई-वडिलांचे की या दिखाऊ महाराजांचे? खरे देव, खरे संत आपल्या घरातच आहेत – आपल्या आई-वडिलांच्या रूपात.
समाजाने जागृत होणे गरजेचे आहे. अशा ढोंगी लोकांचा पर्दाफाश झाला पाहिजे. त्यांच्या संपत्तीची, व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे. श्रद्धा ही आंधळी नसावी, ती जागरूक असावी.
श्रद्धा ठेवा… पण विवेकही ठेवा!
