पारनेर तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर
अहिल्यानगर : नमस्कार या मातीने फार थोर माणसं पाहिलेत बर का ….. रामापासून , कृष्णापासून ते अगदी माऊली तुकोबांपर्यंत …. महाराणा प्रताप इथले…. पृथ्वीराज चव्हाण इथलेच…. शिवराय , शंभूराजे सुद्धा इथलेच…. भिमराव इथले…. ज्योतिबा इथले…. टिळक- आगरकर, गांधी आणि सावरकर ही इथं….! पण आज यांच्या विषयी नाही बोलणार आहोत . आपण आज बोलणार आहोत त्या शक्ती विषयी ज्या शक्तीने अशी अनेक माणसं या मातीला दिली…. ही शक्ती कधी त्या रामासोबत वनवास भोगत अरण्यातून फिरत होती “सीता” बनून…. तर कधी कृष्णालाही आधार देत होती “राधा” बनून…. ताटी उघडा म्हणत माऊलींना जगाचा उद्धार करायला लावणाऱ्या “मुक्ताईच्या” रूपात …. तर कधी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून स्त्री शिक्षणाचे काम करणाऱ्या “सावित्रीच्या” रूपात…. आई , बहीण , मुलगी, पत्नी अशा कित्येक भूमिकांमधून प्रगट होणारी ही शक्ती मात्र कायम उपेक्षितच राहिली आहे. नारीशक्ती म्हणा महिला शक्ती म्हणा किंवा स्त्री शक्ती असं कुठलंही बिरूद लावा पण या शक्तीला कायम इतरांसाठीच खर्च व्हावा लागलंय. आणि मग याच नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी
” यत्र नार्यस्तु पुज्यन्ते रमन्ते तत्र देवता: यत्रैतास्तू न पुजन्ते सर्वास्तत्राफला : क्रिया: | “
असा एखादा श्लोक म्हणण्याची आमच्याकडे जणू पद्धतच आहे…. पण चार-दोन श्लोकांतून झळकणाऱ्या महिला सन्मानापेक्षा कृतीतून बाहेर पडणारा महिला सन्मान जास्त महत्त्वाचा नाहीये का ? बबन अभ्यास कर , कमळ पाणी भर , अजय पाटावर बस, कोमल त्याला वाढ …. लहानपणापासूनच जे बाळकडू आम्हाला दिले जात आहे त्यातून कुठला महिला सन्मान आम्हाला कळणार आहे …. ? आणि मग घरात जर एकच शिळी आणि एक ताजी भाकरी असेल तर ती नेहमी आईनेच खायची …. दोघांपैकी एकाच्याच उच्च शिक्षणाचा खर्च परवडणार असेल तर ते उच्च शिक्षण मुलांनच घ्यायचं…. इथपासून ते अगदी मेलेल्या चितेला अग्नी देण्यासाठी सुद्धा महिला डावल्ली जाते ….
कारण शौर्याची सगळी बिरूद ही पुरुषाला आणि कमकुवतपणाची बिरूद ही स्त्रीसाठी राखीव ठेवल्याचं दिसतय…. म्हणजे जर पुरुष रडत असेल तर , ” काय बायकांसारखा रडतोस?” आणि जर स्त्री मोठ काम करत असेल तर , “काय गड्यासारखं काम करते!”…. असं सहज म्हणतो आणि स्त्रीमध्ये पुरुष शोधण्याचे काम आम्ही करत असतो. एखादी पत्नी आपल्या मुखातून पतीचे नाव घेऊ शकत नाही कारण त्याने पतीच आयुष्य कमी होतं पण तोच पती आपल्या पत्नीला मारझोड करू शकतो…. त्यांन तिच आयुष्य कमी होत नाही. सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा – अकरा वाजेपर्यंत १७-१८ तास काम करणारी बाई जेव्हा ड्युटी वरून आलेल्या नवऱ्याचे पाय चेपत बसते तेव्हा तिचे दुखणारे पाय कोणालाच का दिसले नाहीत….?
आपण भारत देशाला “भारत माता” म्हणतो…. जमिनीला “धरणी माता” म्हणतो …. पृथ्वीला “वसुंधरा माता” म्हणतो…. नदीला देखील मातेचा दर्जा आहे …. एवढेच काय , आम्हाला गाईमध्ये सुद्धा “गोमाता” दिसते…. पण आम्हाला आमच्या “स्त्रियांमध्येच माता” का दिसत नाही ….? थोडक्यात काय , आता महिलांना थोडं समजून घेण्याची गरज आहे. त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे जाणून घेण्याची गरज आहे. कारण , महिलांचे खरे प्रश्न कोणालाच माहीत नाहीयेत…. का माहिती नाहीयेत कारण , तिने ते कधी सांगितले नाहीत. कारण जर ती सांगायला लागली तर , ” किती बोलतेस ” असं म्हणून तिला शांत बसवलं गेलं. आणि जर ती शांत बसली तरच “ती संस्कारी आहे” असं सुद्धा मांडलं गेलं…. पण मंडळी , आता स्त्रियांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे आयुष्यभर डोक्यावर पाण्याची घागर वाहून वाहून तिला डोकेदुखी व्हायला लागलीये …. पाठीचे , मानेचे आजार व्हायला लागलेत…. चुलीवरचे जेवण हे पुरुषांसाठी मौज असते , पण स्त्रियांसाठी कष्ट असतात…. ज्या मासिक पाळीमुळे स्त्रीच स्त्री असणं साजर होतं ती मासिक पाळी आजही अपवित्र मानली जाते…. पुरुषा इतकंच काम करून सुद्धा स्त्रीला कमी वेतन मिळतं …. राजकीय आरक्षण असल्यामुळे तिला निवडणुकीला उभं केलं जातं खरं , पण सगळा कारभार महिलेच्या अडून तिचा नवरा बघत असतो…. कुणीतरी फार सुंदर लिहिलंय की , “प्रत्येक वेळी तुम्ही मुक्त असालच असं नाही कदाचित तुमचा पिंजरा मोठा असेल….” त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये महिलांना असणारी राखीव जागा , सती प्रतिबंधक कायदा , हुंडाबंदी कायदा ,महिला सन्मान योजना हे सगळं महिलांच्या मुक्त असण्याचे उदाहरण नाहीये…. महिलांचा पिंजरा मोठा असण्याचा उदाहरण आहे आणि म्हणून महिला दिन साजरा करायचा असेल तर लहान लहान गोष्टी पासून सुरुवात केली पाहिजे…. हातात कॉफीचा मग घेऊन वूमन नावाच्या मिम वर हसणं आणि स्त्रीत्वाची टिंगल उडवणं थांबवलं पाहिजे…. बाईचं बाईपण हे चित्रपटा पुरत मर्यादित न राहता खऱ्या आयुष्यात सुद्धा ते भारी आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. मुलगी शिकल्याने प्रगती होते म्हणून नाही किंवा एक मुलगी शिकली की अख्ख घर सुशिक्षित होतं म्हणून नाही , तर तिचा अधिकार म्हणून तिला शिकवलं पाहिजे…. “पहिली बेटी; धनाची पेटी” म्हणून नाही तर तिचे जिविताचे हक्क राखण्यासाठी तिला जन्माला घातलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रीचा सन्मान हा सर्वांसमोर करावाच पण एकांतात सुद्धा तिला मान दिला गेला पाहिजे….
जाऊ द्या फार काही बोलणार नाही …. मधुरानी प्रभूळकरांच्या ओळी फक्त सांगते ….
मुलगा म्हणाला , “आई दिव्याची वात मोठी कर; मला वाचता येत नाही….”
वडील म्हणाले , “अग दिव्याची वात कमी कर मला झोप येत नाही….” आणि रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली….
स्वतः जळत राहून तुम्हाला , मला , या समाजाला प्रकाशित ठेवणाऱ्या नारी शक्तीला सलाम…..
(संचालिका- प्रा. सौ. मृणाली गणेश चव्हाण – “श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस , मिरजगाव” )

