क्रांतीसूर्य महात्मा फुले महाराष्ट्राचे दिपस्तंभ- प्रा. प्रियंका दिवटे
(अळकुटी महाविद्यालयात महात्मा फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन)
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून
महात्मा फुले हे भारतातील महान समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणप्रेमी होते. त्यांचे जीवन हे अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे आणि समाजात समानता निर्माण करण्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. महात्मा फुले यांनी स्त्री-शिक्षण आणि दलित शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्री स्वातंत्र्य आणि बालविवाह विरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांनी स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. फुले शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले. त्यांच्या लेखनातून त्यांनी शोषणाविरुद्ध आवाज उठवला. ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन आपल्याला शिकवते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय, धैर्य आणि चिकाटी असेल तर समाजात मोठा बदल घडवता येतो. एकूणच क्रांतीसूर्य महात्मा फुले महाराष्ट्राचे दिपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन प्रा. प्रियंका दिवटे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथे सांस्कृतिक विभागाच्यावतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कुंदा कवडे म्हणाल्या की, विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। या महात्मा फुलेंच्या काव्याद्वारे स्पष्ट होते की, शिक्षण नसल्यास माणसाची विचार करण्याची क्षमता नष्ट होते. बुद्धी नसल्यास योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक याचा निर्णय घेण्याची क्षमता राहत नाही. नीती नसल्यास जीवनात प्रगती होत नाही. प्रगती नसल्यास संपत्ती मिळत नाही. पैसा नसल्यास समाजातील खालच्या स्तरातील लोक अधिकच दडपले जातात व खचून जातात. अशा प्रकारे एका अविद्येने इतके मोठे नुकसान घडते, असे म्हणत महात्मा फुलेंचे कार्य अधोरेखित केले.
याप्रसंगी प्रा. अर्जुन चाटे, प्रा. विशाल रोकडे, गोरख घोलप, सूर्यमाला भोर, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. संजय जाधव, प्रा. दत्तात्रय शेळके, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा.सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. मच्छिन्द्र बेलोटे, प्रा. अमोल नालकर, प्रा. पूजा वैरागर, प्रा. पांडुरंग उघडे, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. अनुराधा गाढवे, डॉ. शांताबाई थोरात, प्रा. संदीप गेटम, प्रा. राजाराम गोरडे, सुनिता भालेराव, नितीन घोलप, छाया म्हस्के, विकास सोनवणे, राहुल बोरुडे, मनोहर कनिंगध्वज, सागर शितोळे, आदी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विशाल रोकडे यांनी केले, तर आभार प्रा. संजय जाधव यांनी केले.
