अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी:अशोक सूर्यवंशी यांच्याकडून
अहिल्यानगर : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षणच नव्हे तर कला, कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तरुणींमध्ये साक्षी भाऊसाहेब माने हे नाव विशेष उल्लेखाने घेतले जाते. विविध कलात्मक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत साक्षी माने यांनी आपल्या प्रतिभेची छाप उमटवली आहे.
एम.कॉम. शिक्षण घेतलेल्या साक्षी माने या नूतन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच त्यांना कला आणि हस्तकलेची विशेष आवड आहे. इयत्ता सहावीत शिकत असतानाच त्यांनी पहिल्यांदा एका नवरीची मेहंदी काढून आपल्या कलाप्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी मेहंदी कलेत विशेष प्राविण्य मिळवले. आज त्या केवळ उत्कृष्ट मेहंदी आर्टिस्ट म्हणूनच नव्हे तर मेहंदीचे क्लासेस घेऊन अनेक विद्यार्थिनींना प्रशिक्षण देत आहेत.
मेहंदी कलेसोबतच साक्षी यांना रांगोळी, वाढदिवस व लग्न समारंभाचे डेकोरेशन, सप्तपदी फ्लॉवर डेकोरेशन, विणकाम, आरीवर्क, रियल फ्लॉवर ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी, नेल आर्ट, मेकअप, हँड एम्ब्रॉडरी तसेच साड्यांना गोंडे बसविणे अशा अनेक कलात्मक क्षेत्रांमध्ये विशेष कौशल्य प्राप्त आहे. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे आणि आकर्षक कलाकृतींमुळे त्यांना परिसरात विशेष ओळख मिळाली आहे.
रांगोळी कलेतही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले असून गावात आयोजित करण्यात येणाऱ्या रांगोळी स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक पटकावून आपल्या कलागुणांचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत कल्पकता, सौंदर्यदृष्टी आणि परिश्रम यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
कलेसोबतच साक्षी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही समर्थपणे सांभाळतात. त्या आई वैशाली भाऊसाहेब माने यांना घरकामात मदत करतात तसेच वडील भाऊसाहेब विश्वनाथ माने यांच्या व्यवसायातही हातभार लावतात. त्यामुळे कुटुंबीयांमध्येही त्यांच्याबद्दल विशेष अभिमानाची भावना आहे. आजोबा विश्वनाथ मारुती माने यांचे संस्कार आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक बळ मिळाले आहे.
“कला, सर्जनशीलता आणि मेहनतीच्या बळावर नवीन गोष्टी शिकणे व इतरांना शिकवणे” हा साक्षी यांचा आवडता छंद असून स्वतःच्या कलेद्वारे लोकांच्या आनंदात भर घालणे, नवीन गोष्टी शिकणे आणि इतरांना शिकवणे हेच त्यांचे ध्येय आहे. भविष्यात आपल्या विविध कलागुणांच्या माध्यमातून समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
अल्पवयातच विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवत कला आणि कौशल्याचा सुंदर संगम घडविणाऱ्या साक्षी माने या आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कलाप्रेमामुळे भविष्यात त्या आणखी मोठी भरारी घेतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.


