सौ.सुनिता सूर्यवंशी यांच्या नियोजनातून महिलांची संस्मरणीय सहल
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी : अशोक सूर्यवंशी
अहिल्यानगर : कोकणगावच्या महिलांची “ज्योतिर्लिंग दर्शन” आनंदयात्रा ठरली संस्मरणीय.घरातील असंख्य जबाबदाऱ्या, कुटुंबाची काळजी, मुलांचे संगोपन आणि संसाराची अखंड धावपळ… या सर्वांमध्ये महिला स्वतःसाठी वेळ काढणे अनेकदा विसरून जातात. मात्र जीवनात आनंद, विरंगुळा आणि मानसिक समाधान यांनाही तितकेच महत्त्व आहे. याच भावनेतून कोकणगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील उत्साही महिलांनी दोन दिवस आणि दोन रात्रींची अत्यंत आनंददायी व आध्यात्मिक सहल आयोजित केली.
या सहलीचे उत्कृष्ट नियोजन सौ. सुनिता संदीप सूर्यवंशी यांनी केले. महिलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे हे त्यांचे पहिलेच कार्य नाही. यापूर्वीही त्यांनी अशाच अनेक सहलींचे यशस्वी नियोजन करून महिलांच्या जीवनात उत्साह, आनंद आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या नियोजनकौशल्यामुळे आणि आत्मीयतेमुळे ही संपूर्ण यात्रा अत्यंत सुरळीत, सुरक्षित आणि संस्मरणीय ठरली.
या सहलीसाठी श्रीगोंदा आगार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची सर्व आधुनिक सुविधा असलेली उत्कृष्ट बस क्रमांक MH-14 MH 8661 उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे, याच बसने या महिला समूहाला यापूर्वीही तब्बल पाच वेळा विविध पर्यटन व धार्मिक स्थळांच्या सहलींसाठी सुरक्षितपणे नेले आहे.
या बसचे चालक आणि वाहक यांनी अत्यंत नम्र, जबाबदार आणि सेवाभावी वृत्तीने काम करत महिलांना सुखद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव दिला. त्यांच्या वेळेचे काटेकोर नियोजन, वाहन चालवण्यातील कौशल्य आणि प्रवाशांशी असलेले प्रेमळ वर्तन यामुळे सर्व महिलांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.
या सहलीदरम्यान श्रीगोंदा, नगर, शनीशिंगणापूर,देवगड, छत्रपती संभाजी नगर, भद्रा मारुती,घृष्णेश्वर, शेगाव, माहूर, नांदेड, औंढानागनाथ, परळी वैजनाथ, आंबेजोगाई, जामखेड, आदी धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देत महिलांनी अध्यात्म, संस्कृती आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला.
स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. तिच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद हे संपूर्ण कुटुंबाला सकारात्मक ऊर्जा देणारे असतात. म्हणूनच महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून अशा सहलींमध्ये सहभागी होणे ही आजच्या काळाची गरज आहे.
सौ.सुनिता संदीप सूर्यवंशी यांचे प्रेरणादायी नियोजन, श्रीगोंदा आगाराची उत्कृष्ट बस सेवा आणि चालक-वाहक यांची समर्पित सेवा यामुळे ही “ज्योतिर्लिंग दर्शन” आनंदयात्रा सर्वांच्या कायम स्मरणात राहील.
या महामंडळाच्या बसने प्रवासाला सुरुवात करतेवेळी महाराष्ट्र राज्य फ्रीडम पावर पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते अशोकराव सूर्यवंशी यांनी बसला श्रीफळ फोडून प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी बाळासाहेब बोरुडे (किराणा दुकानदार) संदीप सूर्यवंशी, सुनिता सूर्यवंशी, बसचे वाहक,चालक उपस्थित होते.


