पारनेर येथील सराफा विरुद्ध मोक्का कारवाईसंदर्भातील अटक परवानगी अर्ज नामंजूर; सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या विधी विभागाची महत्त्वपूर्ण कामगिरी
*अहिल्यानगरl महाराष्ट्र राज्य सराफ संरक्षण समिती प्रसिद्धी प्रमुख मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडूनसराफ सुवर्णकार संरक्षण स मिती, महाराष्ट्र राज्य यांच्या विधी विभागाने आणखी एका महत्त्वपूर्ण प्रकरणात कायदेशीर यश संपादन केले आहे. पारनेर पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गुन्हा रजिस्टर क्र. १११/२०२६ मधील आरोपी श्री. संदीप विठ्ठल मैड यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यासाठी अटक परवानगी मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांकडून अर्ज दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्यानगर येथे झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि उपलब्ध कागदपत्रांचा सखोल विचार केल्यानंतर न्यायालयाने मोक्का अंतर्गत अटक परवानगी देण्यास नकार देत संबंधित अर्ज नामंजूर केला.
सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने समितीचे कायदेशीर सल्लागार ॲड. बी. एम. झगडे यांनी प्रभावी आणि अभ्यासपूर्ण बाजू मांडली. त्यांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या कायदेशीर मुद्द्यांमुळे आणि सक्षम युक्तिवादामुळे हा निकाल लागल्याची प्रतिक्रिया सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख श्री मोहन शंकरराव ढाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कायद्याचे राज्य, संविधानिक मूल्ये आणि प्रत्येक नागरिकाच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवत संविधानिक मार्गाने लढा देणे हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.
सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य ही संस्था सराफ बांधव तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कायदेशीर हक्कांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही संविधानिक मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री.उमेश जी बुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मूळ गुन्ह्याचा तपास आणि इतर न्यायालयीन प्रक्रिया नियमानुसार सुरू राहणार असून, न्यायालयीन निकाल अंतिम होईपर्यंत संबंधित व्यक्तींना दोषी अथवा निर्दोष ठरविण्यात आलेले नाही.


