संस्काराची शिदोरी:-“श्यामची आई”
"आई" या शब्दाचा अर्थ असा होतो "आ " म्हणजे आत्मा व "ई" म्हणजे ईश्वर. एकंदरीत जिच्या आत्म्यात ईश्वराचा वास आहे ती म्हणजे "आई." आई शब्दाला अनेक नावे आहेत. जननी, माय, माऊली,जन्मदात्री इत्यादी.
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी”.
आई साक्षात देवाचे रुप. प्रत्येक ठिकाणी देव येऊ शकत नाही म्हणून देवाने आईचे रूप निर्माण केले. आई ही वासराची माय असते तर दुधावरची साय असते. आई ही लंगड्याचा पाय, कौतुकाची पाठीवर थाप असते. आईविना घर सुनेसुने वाटते. संपूर्ण पृथ्वीचा कागद समुद्राची शाई व जंगलाची लेखणी केली तरी आईचा महिमा लिहिला जाऊ शकत नाही. आईमुळे घराला शोभा, घराचे घरपण,संस्कृती व संस्काराची जपणूक होते. घररुपी मंदिरात आई हे महान दैवत आहे. आईची माया, प्रेम, जिव्हाळा, कळवळा अगाध आहे.
“प्रेम स्वरूप आई,
वात्सल्य सिंधू आई”.
पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी लिखित “श्यामची आई” या पुस्तकातील आईचे बहुमोल संस्कार या लेखात मांडण्याचा प्रयत्न. साने गुरुजी स्नान करताना पायाला घाण लागते म्हणून रडायला लागले. आई साने गुरुजी च्या पायाची घाण साडीच्या पदराने पुसते. साने गुरुजीस आई म्हणते, ” पायाला घाण लागेल म्हणून काळजी घेतोस तसे मनाला घाण लागू नये म्हणून काय करशील”
आईच्या या अनमोल वाक्याने साने गुरुजींच्या बाल मनावर बहुमोल संस्कार केले. बालमन हे संस्कारित असते. आई अशा कोवळ्या बाल मनावर विविध प्रकारचे संस्कार करत असते. मनाची घाण काढायची कशी…..? नाही निर्मळ मन काय करील साबण.संस्काराची शिदोरी लहान मुलांना फार महत्त्वाची असते. त्यामुळे मुलांच्या भविष्याची योग्य जडणघडण होत असते. कोवळ्या निरागस मनावर संस्कार चांगले केले तर जीवनाचे सोने होते.
साने गुरुजी एकदा मित्रा सोबत बागेत फिरायला गेले. त्यांनी बागेत सुंदर फुलांच्या कळ्या पाहिल्या. साने गुरुजीनी विचार केला की सकाळी लवकर या कळ्या फुले होतील. आपण ती फुले तोडायची व आईला देवाचे पुजन करण्यासाठी आणून द्यायची.पण, साने गुरुजींना झोप लागली पहाटे मित्रांनी सर्व उमलेले फुले तोडून नेली. साने गुरुजी उशीरा उठून बागेत गेले त्यांना फुले दिसली नाहीत . ते आश्चर्यचकित झाले व कळ्या तोडून घरी आले. आईने पाहिले श्यामने सर्व कळ्या तोडून आणल्या आहेत. आई श्यामला म्हणाली ,बाळा श्याम, उमलण्याच्या आगोदर फुले तोडली तर देव रागावतो. कळ्या ह्या मुक्या असतात. देवाचे रूप असतात. अशा मुक्या कळ्या तोडू नये. देव रागावतो. हा अनमोल संस्कार किती शिकवण देतो. संस्काराचा खजिना आईजवळ असतो. आई साक्षात संस्काराचे चालते बोलते विद्यापीठ असते. श्यामची आई ही साक्षात संस्काराचा अनमोल खजिना आहे.
“आई प्रेमाचा अपार सागर
वात्सल्याची सोज्वळ मूर्ती
बाळाला दूध अमृत पाजवी
जगात अगाध मायेची कीर्ती.”
रत्नाकर बाबुराव पाटील
[पर्यवेक्षक]
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता.जि. धाराशिव


