टाकळी हाजीतील मळगंगा देवी यात्रा उत्साहात; भाविकांची लाखोंमध्ये उपस्थिती
शरीफ तांबोळी कवठे येमाई शिरूर तालुका प्रतिनिधी
आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या कुंड पर्यटन स्थळ रांजणखळगे (ता.शिरूर) येथील टाकळी हाजी गावचे ग्रामदैवत माता मळगंगा देवीची यात्रा यंदा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.विशेष म्हणजे यंदा नदीला पाणी आल्याने यात्रेचा आनंद अधिकच द्विगुणित झाला असून भाविकांनी मनसोक्त यात्रा अनुभवली.
तीन दिवस चाललेल्या या यात्रेत लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. कुकडी नदीकाठी पाणी साचल्याने परिसर निसर्गरम्य झाला होता. अनेक भाविकांनी स्नान करून देवीचे दर्शन घेतले, त्यामुळे यात्रेला धार्मिकतेसोबतच निसर्गसौंदर्याचीही जोड मिळाली.
चैत्र शुद्ध अष्टमीपासून यात्रेला सुरुवात झाली. देवीची काठी व पालखी मिरवणूक पारंपरिक पद्धतीने गावातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत तब्बल २०० बैलगाड्यांनी सहभाग घेतला. ५ लाख १९ हजार ६२२ रुपयांच्या बक्षिसांसाठी झालेल्या या शर्यतीने यात्रेला विशेष रंगत आणली.याशिवाय कै.संजय महाजन यांचे आनंद लोकनाट्य तमाशा, विविध व्यापारी स्टॉल व बाजारपेठ यामुळे यात्रेला मोठी गर्दी झाली. संपूर्ण गाव विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते.
यात्रेदरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाल्याने स्थानिक व्यावसायिकांना मोठा फायदा झाला.
माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे तसेच सरपंच अरुणा घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आले.भाविकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने यात्रा शांततेत व उत्साहात संपन्न झाली.
