शिरूरच्या बेट भागात शेतकरी चिंतेत ; लाखेवाडीत चिंच-आंब्यांची झाडे जळून लाखोंचे नुकसान
शरीफ तांबोळी शिरूर तालुका प्रतिनिधी यांच्याकडून
सविस्तर वृत्त खालील प्रमाणे
शिरूर तालुक्यातील बेट भागात शेतकऱ्यांवर संकटांची मालिका कायम असून अडचणी दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहेत. केबल चोरी, मोटार चोरी, डाळिंब चोरी , पशुधन गाय म्हैस चोरी यांसारख्या घटनांनी आधीच हैराण झालेल्या शेतकऱ्यांना निसर्गाचीही साथ मिळत नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे घसरलेले बाजारभाव, तसेच औषधे, खते व कृषी साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अशा परिस्थितीत मलठण येथील लाखेवाडी परिसरात घडलेली आगीची घटना शेतकरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. येथील शेतकरी शुभम भगतसिंग दंडवते यांच्या शेतातील चिंच व आंब्याच्या झाडांना अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावल्याची तक्रार नुकतीच शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
या भीषण आगीत चिंचेची तब्बल ७० झाडे पूर्णतः जळून खाक झाली, तर सुमारे ३० झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय आंब्याची १० झाडेही अंशतः जळाली आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून अनेक वर्षांच्या कष्टांची अक्षरशः राख झाल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान, टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्रात शेतकऱ्यांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. कृषी पंप चोरी, विद्युत रोहित्र फोडणे, डाळिंब व इतर पिकांची चोरी, केबल चोरी तसेच पशुधन चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेट भागात शेती हा पारंपरिक व्यवसाय स्वीकारून अनेक युवक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे वळत आहेत. मात्र अशा प्रकारच्या घटना त्यांच्या मनोबलावर परिणाम करणाऱ्या ठरत असून गुन्हेगारांना पकडण्यात येणाऱ्या अपयशामुळे शेतकऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत चालल्याची भावना व्यक्त होत आहे.
वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकऱ्यांना स्वतःच शेताची राखण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने ठोस व कडक उपाययोजना करून शेतकऱ्यांना सुरक्षा व दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
