धोक्याची घंटा! भेंडा खुर्द–गोंडेगाव मार्गावरील जीर्ण कालवा पूल; दुरुस्तीचे तातडीचे आदेश
रेलिंग तुटले, पुलांना तडे; अपघाताचा वाढता धोका — सार्वजनिक बांधकाम विभागाचा इरिगेशनला इशारा
प्रतिनिधी बाळासाहेब बोधक
नेवासा तालुका प्रतिनिधी यांच्याकडून
भेंडा खुर्द ते गोंडेगाव या महत्त्वाच्या जिल्हा मार्गावरील मूळ उजवा कालवा चारी क्रमांक २ व ३ वरील पूल अक्षरशः जीवघेणे बनले असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे भीषण चित्र समोर आले आहे. पुलांवरील लोखंडी रेलिंग पूर्णपणे तुटलेली असून अनेक ठिकाणी काँक्रीटला मोठे तडे गेले आहेत. परिणामी, दररोज ये-जा करणारे ग्रामस्थ, वाहनचालक आणि पाळीव प्राणी गंभीर धोक्याच्या छायेत प्रवास करत आहेत.
या धोकादायक परिस्थितीची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नेवासा यांनी मूळ इरिगेशन उपविभाग, चीलेखनवाडी यांना तातडीने दुरुस्ती करण्याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे. भेंडा खुर्द, दहिगाव, देवगाव आदी गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, पुलांची अवस्था पाहता अपघात अटळ असल्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या पुलांवरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. अंधारात तुटलेल्या रेलिंगमुळे वाहन घसरून कालव्यात कोसळण्याचा धोका वाढला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने इरिगेशन विभागास स्पष्ट शब्दांत इशारा देत तात्काळ दुरुस्ती, देखभाल व सुरक्षितता उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा संभाव्य अपघातांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी चंद्रकांत चौधरी, सुखदेव साळवे, दत्तू आघाव, ज्ञानेश्वर कडू, नितीन नवले, रावसाहेब मोरकर, गणेश नवले, भाऊसाहेब गदाई व चंद्रकला रोकडे यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. “एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहताय का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा अपघात घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
