प्रतिनिधी बाळासाहेब बोधक
*नेवासा तालुका प्रतिनिधी
भेंडा खुर्द व परिसरातील नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या विविध सवलत योजनांची जनजागृती व्हावी व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ मिळावा, या उद्देशाने दि. २७ व २८ एप्रिल २०२६ रोजी भव्य शिबिर व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि मोठ्या उत्साहात पार पडला.
नेवासा आगार व्यवस्थापक प्रशांत होले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी नवनियुक्त महाराष्ट्र पोलीस दलातील आकाश गीनेनदेव नवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सरपंच वैभव दादा नवले, उपसरपंच सागर महापूर, ग्रामसेवक घाणमोडे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ नवले, अशोक चौधरी यांच्यासह जगदंब युवा प्रतिष्ठानचे चंद्रकांत चौधरी, नितीन नवले, बाळू नवले, ज्ञानेश्वर कडू, प्रकाश नवले, विकास साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान फारुख भाई शेख यांनी NCMC नोंदणी, ज्येष्ठ नागरिक सवलत योजना, महिला सन्मान योजना, दिव्यांग योजना तसेच स्मार्ट कार्डद्वारे प्रवास करताना मिळणाऱ्या विविध सुविधांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली. योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रवासातील सवलतींचे महत्त्व त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
या मेळाव्यास ज्येष्ठ नागरिक नामदेव महापूर, मोहन नवले, मच्छिंद्र शिंदे, जनाबाई धनवडे, सिंधू चव्हाण यांच्यासह महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. एकूण २५० हून अधिक नागरिकांनी नोंदणी करून विविध योजनांचा लाभ घेतला.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एसटीच्या योजनांची अचूक माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशा जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
