रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी,कवि,गायक,महान प्रबोधनकार, संत तुकडोजी महाराजांच्या अनमोल कार्याचा उजाळा देण्याचा माझा प्रयत्न. माणिक बंडोजी इंगळे हे मुळचे नाव असणारे “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” म्हणून ओळखले जातात. खंजिरी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचे अनमोल कार्य केले.
खंजिरी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक छोटे से चर्मवाद्य आहे.गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते.लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठराविक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात.या चकत्या एकमेकावर आपटून नाद निर्माण होतो. खंजिरी एका हातात धरून दुसऱ्या हाताने आघात करून वाजवली जाते.लोकसंगीतात खंजिरीचा नियमित वापर केला जातो. खंजिरी हे वाद्य तुकडोजी महाराज त्यांच्या भजनात वाजवीत असत. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिव्यवस्था दूर करण्यासाठी भजन व कीर्तनाचा प्रभावी वापर केला. ज्यांनी आत्मसंयमी विचार ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषेत अनेक काव्यरचना केल्या. तुकडोजी महाराजांनी इ. स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार समाज प्रबोधन करण्यासाठी निवडला. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू होते. गुरू आडकोजी महाराजांनी त्यांचे मूळचे नाव माणिक हे बदलून तुकडोजी ठेवले. विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्रात व देशभर पर्यटन करून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. जपान सारख्या प्रगत देशात जाऊन सर्वांना विश्वबंधूत्वाची शिकवण दिली. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात तुकडोजी महाराजांना अटक झाली.
“आते है नाथ हमारे|”
हे त्यांचे पद स्वातंत्र्य चळवळीत स्फूर्ती गीत ठरले. भारत हा खेड्यांचा देश आहे. ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होतो. हीच भावना व श्रद्धा तुकडोजी महाराजांची होती. समाजातील सर्वच लोकांचा उद्धार कसा होईल या विचारसरणीमूळे चिंता वाटत होती. ग्रामोन्नती व ग्रामीण कल्याण हेच त्यांचे लक्ष होते. भारतीय खेड्यांचा त्यांना चांगला अभ्यास होता.
ग्रामीण विकासाच्या विविध समस्यांवर मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याबद्दल उपाय योजना सांगीतल्या.अमरावतीजवळ मोझरी च्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य आहे. ग्रामगीतेचे लेखन त्यांच्या जीवन कार्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याबद्दल विविध उपाय योजना सुचविली. ग्राम सुशिक्षित, सुसंस्कृत, संपन्न व्हावेत. देशाच्या गरजा गावांनी भागवाव्यात. ग्रामउद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे. गावातील देवभोळेपणा, जुनाट अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात.
सर्वधर्मसमभाव यासाठी सामुदायिक सर्वधर्म प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ दृष्टीने एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे होते. अनावश्यक कर्मकांडाला विरोध केला.
खंजिरी भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. अखिल भारतीय पातळीवर साधु संघटनेची स्थापना केली. महिला उन्नती व्हावी यासाठी अनमोल योगदान दिले. कुटुंब, समाज, राष्ट्रव्यवस्था स्त्रीवर अवलंबून असते.
देशाचे तरूण हीच राष्ट्रीय संपत्ती असते. तरूणाने बलाची उपासना करावी. समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करावे. तरुण पिढी व्यसनमुक्त असावी. व्यसन हे राष्ट्राला लागलेला कलंक आहे. ऐहिक व पारलौकिक गोष्टींचा सुरेख संगम तुकडोजी महाराजांच्या साहित्यात सापडतो. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात तुकडोजी महाराजांचे खंजिरी भजन ऐकले व प्रसन्न होऊन राष्ट्रसंत ही उपाधी बहाल केली.
तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विनी कृष्ण पंचमी ३१ ऑक्टोबर १९६८ रोजी झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली,
सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली अशा अनेक साहित्य रचना लिहिल्या.अशा महान परम पूज्य राष्ट्रसंतांच्या चरणी कोटी कोटी वंदन.
रत्नाकर बाबुराव पाटील {सहशिक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता.जि. धाराशिव
