कोपरगाव तालुका प्रतिनिधी श्री प्रशांत टेके पाटील यांच्याकडून
श्रीक्षेत्र कान्हेगाव येथे भाविकांची मोठी गर्दी कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कान्हेगाव येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा महोत्सवाला मंगळवारी (ता. २८) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट देत कथा श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी श्रीक्षेत्र कान्हेगाव येथे खासदार निधीतून दशक्रिया विधी घाट बांधून देण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
श्री नृसिंह महाराज मंदिर परिसरात ह.भ.प. भागवताचार्य बाळकृष्ण महाराज सुराशे यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद् भागवत कथेला बुधवार (ता. २२ एप्रिल २०२६) रोजी प्रारंभ झाला असून सातव्या दिवशी खासदार वाकचौरे यांनी उपस्थित राहून कथा श्रवणाचा आनंद घेतला. यावेळी मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला होता.
भागवत कथेदरम्यान बाळकृष्ण महाराज सुराशे यांनी भागवत धर्म, संत परंपरा, नामस्मरणाचे महत्त्व तसेच मानव जीवनातील अध्यात्माचे स्थान यावर प्रभावी निरूपण केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. कथास्थळी हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी श्रीक्षेत्र कान्हेगावच्या विकास कामाचा आढावा खासदार वाकचौरे यांनी आढावा घेऊन
सकारात्मक प्रतिसाद देत खासदार निधीतून दशक्रिया विधीसाठी घाट उभारणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या घोषणेचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
कथेसाठी कान्हेगाव पंचक्रोशीतील वारी, कोकमठाण, संवत्सर, भोजडे, लौकी, तळेगाव मळे, धोत्रे, रामवाडी, सडे, शिगवे, रुई आदी गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनीही कथा श्रवणाचा लाभ घेतला.
कथा महोत्सवाच्या आयोजनासाठी ग्रामस्थ व मंदिर समितीच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात येत असून भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्रीमद् भागवत कथेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
