दरोडी गावचा ‘कोहिनूर हिरा’ हरपला; माजी आदर्श सरपंच अनिलशेठ पावडे यांचे दुःखद निधन*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
दरोडी (ता. पारनेर) : दरोडी गावचे माजी आदर्श सरपंच तथा दरोडी उत्कर्ष पतसंस्थेचे चेअरमन अनिलशेठ लक्ष्मण पावडे यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दरोडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एक कर्तृत्ववान, लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणारा तरुण नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
अनिलशेठ पावडे यांचा जन्म ९ ऑगस्ट १९८२ रोजी दरोडी येथील शेतकरी कुटुंबात झाला. गावातच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर नोकरीचा मार्ग न स्वीकारता त्यांनी शेती व समाजसेवा हेच आपले कार्यक्षेत्र निवडले.
घरातूनच त्यांना सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा लाभला होता. त्यांचे आजोबा कै. मार्तंडराव पावडे यांनी तब्बल दहा वर्षे दरोडी गावचे सरपंच म्हणून कार्य केले. गावातील न्यायनिवाड्यासाठी लोक त्यांच्या घरी येत असल्याने त्यांना “न्यायाधीश” म्हणूनही ओळखले जात असे. तसेच चुलते पोपटशेठ पावडे यांच्या मार्गदर्शनातून उद्योगशीलतेची प्रेरणा घेत अनिलशेठ यांनी शेती विकासाशी निगडित विविध उपक्रम आणि उद्योग व्यवसाय उभा केला.
सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे सन २०११ मध्ये ते प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग २०२६ पर्यंत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य केले. २०१६ ते २०२१ या कालावधीत त्यांनी दरोडी गावचे सरपंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या विकासाभिमुख व लोकहिताच्या कार्याची दखल घेत २०१७-१८ मध्ये त्यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून ते आजाराशी झुंज देत होते. अखेर २५ जुलै २०२६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने दरोडी गावासह संपूर्ण पारनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. ही माहिती त्यांचे बंधू तथा पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक संग्राम पावडे यांनी दिली.
अनिलशेठ पावडे यांच्या पश्चात आई श्रीमती कमल लक्ष्मण पावडे, पत्नी श्रीमती उर्मिला अनिल पावडे, बंधू राजू पावडे व अविनाश पावडे, पुत्र अथर्व पावडे व आदित्य पावडे, तसेच चुलते पोपटशेठ पावडे व सुदामशेठ पावडे असा मोठा परिवार आहे.
अनिलशेठ पावडे यांच्या रूपाने दरोडी गावाने एक विकासाभिमुख, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा आणि जनतेच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणारा लोकनेता गमावला आहे. त्यांच्या कार्याची आठवण गावाच्या विकासाच्या इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील.



