पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरडयांच्याकडून सविस्तर वृत्त असे की विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी
देवीभोयरे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मा. काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उद्घाटनासह सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला अचानक राजकीय वादाचे गालबोट लागले. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) अशोक सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवरून वाद सुरू झाला. पाहता पाहता वादाचे रूपांतर जोरदार शाब्दिक चकमकीत झाले. परिस्थिती इतकी तापली की दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आली आणि कार्यक्रम पुढे सुरू करण्यात आला.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मा. काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातच सत्ताधारी आणि सहकारी पक्षातील संघटना पातळी वर जिल्हा व राज्य स्तरावर पदे भूषविणाऱ्या नेत्यांमध्ये झालेल्या या शाब्दिक वादाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
विकासकामांच्या उद्घाटनासाठी आयोजित कार्यक्रमाला राजकीय वादाचे स्वरूप आल्याने “उद्घाटन विकासकामांचे की राजकीय आखाड्याचे?” अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

