*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोज करयांच्याकडून सविस्तर वृत्त असे की तमाशा क्षेत्रातील कलावंत
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई साळवे यांचा संघर्षमय जीवनप्रवास; मदतीसह पुरस्कारासाठी निवडीचे आवाहन
शिरूर : वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून तमाशाच्या रंगमंचावर कला सादर करणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई चंद्रकांत साळवे फुलवडेकर यांचा जीवनप्रवास संघर्ष आणि कलेप्रती असलेल्या समर्पणाची कहाणी सांगणारा आहे. वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या कांताबाई यांनी गेली सुमारे ५० ते ५५ वर्षे तमाशा क्षेत्रात लावणी, बतावणी आणि वगनाट्य अशा विविध प्रकारांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
कांताबाई यांनी गणपतराव व्ही. माने चिंचणीकर यांच्या तमाशा मंडळात अनेक वर्षे काम केले. ‘इंद्रा जन्माला ये पुन्हा’ या वगनाट्यातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांनी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या तमाशा मंडळातही अनेक वर्षे काम केले.
तमाशाच्या कार्यक्रमादरम्यान कांताबाई यांच्या पायाला स्टेजची फळी लागून दुखापत झाली होती. त्यावेळी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांनी त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्या पुन्हा तमाशाच्या रंगभूमीवर परतल्या.
पुढे त्यांचे पती चंद्रकांत फुलवडेकर यांनी स्वतंत्र तमाशा मंडळ सुरू केले. या मंडळाने महाराष्ट्राच्या विविध भागांत कार्यक्रम सादर केले. या काळात कांताबाई यांच्या विविध भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या.
मात्र, पतीच्या निधनानंतर कांताबाई यांच्या आयुष्यात मोठे संकट आले. लहान मुलांची जबाबदारी, संसाराचा भार आणि आर्थिक अडचणी यांचा सामना करत त्यांनी कुटुंबाचा गाडा पुढे नेला. त्यांच्या दोन बहिणीही आता वयोवृद्ध असून त्यांच्यावरही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत कांताबाई आजही संघर्षमय जीवन जगत आहेत.
तृप्ती फिल्म प्रोडक्शनकडून जीवनप्रवासाची मुलाखत
तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदासजी राऊत यांनी काही दिवसांपूर्वी कांताबाई साळवे यांच्या जीवनप्रवासाची मुलाखत प्रदर्शित केली. या मुलाखतीनंतर महाराष्ट्रातील विविध कलावंत आणि कलाप्रेमींनी फोन करून कांताबाईंची विचारपूस केली.
मात्र, केवळ सहानुभूती व्यक्त करून थांबण्यापेक्षा समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि कलाप्रेमींनी पुढे येऊन कांताबाई यांना शक्य ती मदत करावी, असे आवाहन रामदास राऊत यांनी केले आहे.
पुरस्कारासाठी निवड करण्याचे आवाहन
कांताबाई यांनी आपल्या प्रदीर्घ कलाप्रवासात तमाशा क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले असले तरी अद्याप त्यांना कोणताही छोटा-मोठा पुरस्कार मिळालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. पुरस्कारासाठी आजपर्यंत आपल्याला कुठूनही बोलावण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना आणि सांस्कृतिक संस्थांनी त्यांच्या प्रदीर्घ कलासेवेची दखल घेऊन कांताबाई साळवे यांची योग्य पुरस्कारासाठी निवड करावी, असे आवाहन रामदास राऊत यांनी केले आहे.
कांताबाई साळवे यांचा जीवनप्रवास हा केवळ एका तमाशा कलावंताचा प्रवास नसून प्रतिकूल परिस्थितीतही कलेशी नाते कायम ठेवणाऱ्या एका ज्येष्ठ कलाकाराच्या संघर्षाची कहाणी आहे.



