अहिल्यानगर येथे दैनिक ‘लोक परिवर्तन’चा वर्धापन दिन व सन्मान सोहळा संपन्न
*जेष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर यांच्याकडून
अहिल्यानगर | 27 सप्टेंबर 2026
अहिल्यानगर येथील नातकृपा सांस्कृतिक भवन येथे दैनिक ‘लोक परिवर्तन – निर्भीड आवाज जनतेचा’ यांचा वर्धापन दिन व सन्मान सोहळा २०२६ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते व कार्यक्रमाचे व्यवस्थापक माननीय अशोकराव सूर्यवंशी, संपादक आबासाहेब शिरसाट, सहसंपादक व कार्याध्यक्ष मुकुंदराव निघोजकर, उपसंपादक पोपटराव सोनवणे तसेच डॉ. भारत भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्राच्या विविध भागांतून पत्रकार तसेच मान्यवर उपस्थित होते. यामध्ये तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदास राऊत (शिरूर), चित्रपट अभिनेते अमोलजी गायकवाड (शिरूर), दैनिक वरूडचे पत्रकार संपत वैरागर सर आणि पत्रकार संदीपजी शितोळे सर यांची उपस्थिती होती.
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई घोडनदीकर यांचा सन्मान
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती कांताबाई घोडनदीकर (फुलवडेकर) यांचा करण्यात आलेला सन्मान.
वयाच्या ७०व्या वर्षीही कलेच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल कांताबाई घोडनदीकर यांना शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मान स्वीकारल्यानंतर कांताबाई घोडनदीकर यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी बोलावून सन्मानित केल्याबद्दल आयोजक व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे वर्धापन दिन व सन्मान सोहळ्याला विशेष रंगत आली.



