ग्रामीण कलाकारांसाठी रामदास राऊत यांचे कार्य उल्लेखनीय – मोहन पानसरे
*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोज कर यांच्याकडून
शिरूर : ग्रामीण भागातील तसेच ज्येष्ठ आणि अडचणीत असलेल्या कलाकारांना आधार देण्यासाठी तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदास राऊत सातत्याने काम करत आहेत. कलाकारांप्रती त्यांचे प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी उल्लेखनीय असल्याचे मत ज्येष्ठ नाट्य निर्माते व अभिनेते मोहन पानसरे यांनी व्यक्त केले.
रामदास राऊत हे महाराष्ट्रातील विविध भागांत जाऊन जुन्या आणि ज्येष्ठ कलाकारांच्या भेटी घेत आहेत. तमाशा, नाटक, वगनाट्य, सनई, संबळ, ताशा-बँड यांसारख्या विविध कलाक्षेत्रांतील कलाकारांच्या मुलाखती घेऊन त्यांचे कार्य समाजासमोर आणण्याचे काम ते करत आहेत.
अडचणीच्या परिस्थितीत असलेल्या कलाकारांना शक्य तितकी वैयक्तिक मदत करणे, त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यांच्या परिस्थितीची समाजाला जाणीव करून देणे, असे कार्य राऊत करत आहेत. हे काम ते कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अनेक वर्षांपासून करत असल्याचे पानसरे यांनी सांगितले.
राऊत यांनी नुकतीच आपली २१६ वी कलाकार मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी प्रसिद्ध तमासगीर आणि ज्येष्ठ कलाकार मास्तर दत्तोबा चव्हाण यांची भेट घेतली. सुमारे ९० वर्षांचे दत्तोबा चव्हाण यांनी अनेक वर्षे तमाशा आणि वगनाट्याच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. मात्र वृद्धापकाळात त्यांची परिस्थिती कठीण झाली आहे. अशा वेळी राऊत यांनी त्यांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली.
अनेक ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या तरुणपणी कला क्षेत्रात मोठे योगदान दिले; मात्र वयोमानानुसार त्यांच्यावर आर्थिक आणि सामाजिक अडचणी ओढवल्या आहेत. अशा कलाकारांना समाजाने आणि शासनाने आधार देण्याची गरज आहे, असे पानसरे यांनी नमूद केले.
रामदास राऊत यांच्या माध्यमातून अशा कलाकारांना आधार मिळत असून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलत असल्याचेही त्यांनी सांगितले. कलाकारांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय आणि आधार मिळवून देण्यासाठी समाजानेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन मोहन पानसरे यांनी केले.
“कलाकारांची सेवा हीच कलेची सेवा आहे. रामदास राऊत यांचे हे समाजोपयोगी कार्य असेच सुरू राहावे,” अशी सदिच्छा पानसरे यांनी व्यक्त केली.



