मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कमी लेखू नये
ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार नाना ढवळे यांचे प्रतिपादन
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा झगमगाट पाहून आपल्याला कमी लेखू नये. असे आपले मत ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार नाना ढवळे यांनी मांडले.
२७ फेब्रुवारी शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. त्यानिमित्त वक्ते म्हणून देवीभोयरे येथील जि.प. केंद्र शाळेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, तेव्हा भारत देश इंग्रजांचा अंकित होता. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा पुणे येथे पेशव्यांच्या दरबारात रेसिडेन्ट होता. तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नरही होता. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेला असूनही त्याला मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत होती. मग मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला तरी त्या विद्यार्थ्याला अन्य मार्गाने इंग्रजीवर प्रभुत्व मिळविता येणार नाही का? असा परखड सवालही त्यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडला.
कार्यक्रमाच्या शेवटी संगिता मोरे यांच्या हस्ते ढवळे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब वाळुंज होते. प्रास्ताविक आणि समारोप दादाभाऊ बेलोटे यांनी केले.
यावेळी मंजाभाऊ तिकोणे, बाळासाहेब दिघे, पुष्पा मोरे, सुनीता गाडेकर, सुलोचना बेलोटे, वर्षा मगर, अक्षदा मुळे आदी शिक्षकवृंद उपस्थित होता. विद्यार्थ्यांची हजेरीही लक्षणीय होती.
