कुमारी प्रणाली लाळगे जिल्ह्यात सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून
प्रणाली लाळगे जिल्ह्यात सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण
अळकुटी (प्रतिनिधी) – भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, लोणी मावळा संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, लोणी मावळा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षा 2025–26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
या परीक्षेत कु. प्रणाली ज्ञानदेव लाळगे हिने 145 गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळविण्याचा मान मिळविला आहे. गणित विषयात तिने पैकीच्या पैकी गुण मिळविले असून राज्य गुणवत्ता यादीतही तिचे स्थान निश्चित मानले जात आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रणाली लाळगे (145), सृष्टी मावळे (111), पायल कवडे (109), कृष्णा चासकर (108), हर्षल शेंडकर (108), गौरव जगदाळे (101), अथर्व कामठे (99), श्रीनील झरेकर (98), पूर्वा शेंडकर (98), मानसी शेंडकर (97), श्रुतिका मावळे (84), निकुंज पडवळ (83), अश्विनी दुगड (81), अक्षदा चासकर, वैष्णवी कापसे, विवेक गायकवाड, साई लामखडे, तनुजा नायकोडी, अन्विता मावळे, प्रीती मावळे, सोहम मावळे, सृष्टी कामठे व कृष्णा आव्हाड यांचा समावेश आहे.
या यशामागे विद्यालयाचे नियोजनबद्ध शैक्षणिक उपक्रम कारणीभूत ठरले. विद्यार्थ्यांना वर्षभर जादा तास घेऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच सुट्टीच्या काळातही विशेष सराव वर्ग आयोजित करण्यात आले. अधिकाधिक सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेत विद्यार्थ्यांची पद्धतशीर तयारी करून घेण्यात आली.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मच्छिंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख बाबासाहेब दौंड, हरीभाऊ जाधव, बाबाजी मावळे, अमृता लोंढे, बाळासाहेब मापारी, संतोष झरेकर, रघूनाथ पवार व एल. एस. गुंड या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, विविध संस्था, माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
